दापोली : येथे महसूल विभागाच्या पथकाने चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी डंपरचालक व मालक यांच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दापोली तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईनुसार, वेळवी येथील मंडळ अधिकारी किरण अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डंपरमधून चालक संदीप रामचंद्र चौगुले याला विनापरवाना अनधिकृत गौण खनिजची (वाळू) अवैधरीत्या वाहतूक करत असताना, तालुक्यातील देहेण येथे ग्रामस्थांनी २० ऑक्टोबरला डंपर अडवून महसुलाच्या ताब्यात दिला.
डंपरमध्ये सुमारे दोन ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. महसूल विभागाने तत्काळ डंपर ताब्यात घेत मालक सेतुलाल भिलू राठोड यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. शासनाच्या नियमानुसार, डंपरचालक आणि मालक यांच्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, हर्णे येथील मंडळ अधिकारी विनोद ज्ञानदेव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑक्टोबरला दुपारी तीन डंपरमधून प्रत्येकी एक ब्रास वाळूची विनापरवाना चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या पथकाने हे तीनही डंपर जप्त करून चालक व मालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली असून, या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात सुनील यलप्पा चौगुले (रा. नवानगर, दापोली), संतोष सुरेश कडू (रा. वेताळवाडी, खेड) आणि संजय बाबाखोत जाधव (रा. अडखळ, ता. दापोली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये दापोली पोलिसांनी चालक आणि मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल संतोष सडकर आणि राजू मोहिते करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 31/Oct/2025












