चिपळूण : काही उच्च परंपरा प्रथा या जपायच्या असतात, मीच विक्रांतला सांगितल हाेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सत्कार कर. माझ्याच सांगण्यावरुन ताे अजित पवारांना भेटला हाेता, अशाी स्पष्टाेक्ती गुहागरचे आमदार तथा उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांनी चिपळूण दाैऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली हाेती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. साेमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चिपळुणात आले असता आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आमदार जाधव म्हणाले की, शरद पवार हे माझ्याकरता दैवत आहेत. ११९५ साली मी पहिल्यांदा आमदार झालो त्यानंतर मी कोल्हापूरला गेलो होतो. त्यावेळी १९५२ साली झालेले खासदार रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापूरमध्ये सत्कार केला. त्यावेळी ते म्हणाले हाेते की, माझ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तरी त्याला मी शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो.
काही विचार हे मनावर कोरले जातात, काही उच्च परंपरा प्रथा या जपायच्या असतात, जोपासायच्या असतात. त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस आले होते, चंद्रशेखर बावनकुळे आले होते. त्यांचे मी शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले होते. मी राष्ट्रवादीत होतो तेव्हा उद्धव ठाकरे गुहागरात आले होते, त्यांचाही मी शाल, श्रीफळ पाठवून सत्कार केला होता.
मी ही एक प्रथा ठेवलेली आहे. सर्व तरुणांना कळलं पाहिजे ही उच्च परंपरा काय आहे, ते संस्कार मी माझ्या मुलांवर केले आहेत. मीच सांगितलं विक्रांतला अजितदादांचा सत्कार कर, असे आमदार जाधव म्हणाले. त्याच प्रथेप्रमाणे मी माझा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून शरद पवार यांच्या स्वागताला आलो आहे. माझ्या हृदयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव काेरले आहे तसेच पवार साहेबांचं स्थान अढळ आहे, असे ते म्हणाले. आजच्या सभेला आपण उपस्थित राहणार का, असे विचारले असता आजची सभा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आहे, असे सांगून अधिक भाष्य करणे टाळले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 23-09-2024
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰