Bal Mane: जे.के. फाईल्सच्या १६.५ एकर जागेची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना उपनेते बाळ माने यांची पत्रकार परिषदेत मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील बंद पडलेल्या जे.के. फाईल्स (J.K. Files) कारखान्याच्या जागेच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाला असून, सुमारे १६० कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन अत्यंत कमी किमतीत विकण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उद्योग विभागाने सखोल चौकशी करावी, तसेच जैतापूर आणि रीड येथील संभाव्य एमआयडीसी भूसंपादन प्रक्रियेतही दिल्ली-गुजरातचे गुंतवणूकदार दलालांमार्फत गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बाळ माने यांनी रविवारी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी रत्नागिरीतील औद्योगिक आणि राजकीय परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले.

जे.के. फाईल्सच्या १६० कोटींच्या जमिनीची चौकशी करा

बाळ माने म्हणाले, “रत्नागिरीत ४५ वर्षांपूर्वीचा सिंघानिया ग्रुपचा जे.के. फाईल्सचा कारखाना सुरू होता. मात्र दुर्दैवाने गेल्या सात-आठ वर्षांपासून हा कारखाना आजारी पडून बंद पडला आहे. एमआयडीसीमधील (MIDC) ‘ए-वन’ आणि ‘ए-टू’ प्लॉटमधील या कारखान्याची एकूण साडेसोळा एकर (१२ + ४.५ एकर) जमीन आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की, या जमिनीची आजची मार्केट व्हॅल्यू (बाजारभाव) सुमारे १६० कोटी रुपये असताना, हा संपूर्ण व्यवहार अत्यंत अल्प किमतीमध्ये कोणीतरी केलेला आहे.”

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माने यांनी केली आहे. “मी उद्योग विभागाचे सचिव आणि त्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे यांना विनंती करणार आहे की, या सगळ्या व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी. चौकशी होऊन त्या ठिकाणी नवीन कारखाना उभा राहिला पाहिजे. जे.के. फाईल्स बंद पडल्यामुळे देशोधडीला लागलेल्या तीन-चार हजार कामगारांना किंवा नवीन तरुण कारागिरांना तिथे नोकरी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे,” असे माने यांनी ठणकावून सांगितले.

वाटद-रीळ MIDC भूसंपादनात दलाली

रत्नागिरीच्या औद्योगिकीकरणावर बोलताना माने यांनी वाटद आणि रीळ येथील भूसंपादनावरही बोट ठेवले. ते म्हणाले, “जयगडला जिंदाल उद्योग समूहाचा कारखाना सुरू आहे आणि त्या परिसरात एमआयडीसी होऊ घातल्याचे आम्हाला कळते. तसेच रीळ गावातही एमआयडीसीसाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, एमआयडीसीसाठी भूसंपादन होत असताना नजीकच्या काळात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असणे अपेक्षित असते. पण माझा आरोप आहे की, त्या ठिकाणी दिल्ली, गुजरातपासून मुंबईपर्यंतचे मोठे गुंतवणूकदार दलालांच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब, सामान्य भूमिपुत्रांच्या जमिनी कमी किमतीत विकत घेत आहेत. या जमिनी नंतर एमआयडीसीला जास्त किमतीने विकण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने याचीही सखोल चौकशी करावी,” अशी मागणी बाळ माने यांनी केली.

नगर परिषद निवडणूक: मविआमध्ये प्राथमिक चर्चा

आगामी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये हालचाली सुरू झाल्याची माहितीही बाळ माने यांनी दिली. ते म्हणाले, “आमचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, समन्वयक रवी डोळस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष बारक्याशेठ बने व त्यांचे सहकारी यांच्यात एक बैठक पार पडली. ही एक प्राथमिक चर्चा होती. यामध्ये नगरसेवक पदासाठी व नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या किंवा किती जागा पाहिजेत, यावर चर्चा झाली. ही केवळ त्यांची मागणी आहे, हा अंतिम निर्णय नव्हे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आदरणीय पवार साहेब यावर योग्य तो निर्णय घेतील.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:43 03-11-2025