रत्नागिरी: Ratnagiri Rain Update समोर येत असून अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मान्सूनचा जोर चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाने ३ आणि ४ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०५.५९ मिमी या वेगाने एकूण ९५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झाली असली, तरी अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होण्यासह मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
२४ तासांतील तालुकावार पावसाची आकडेवारी
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत सर्वच नऊ तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात १४३.७७ मिमी इतका नोंदवला गेला.
तालुकावार पावसाची नोंद (मिमी मध्ये):
- रत्नागिरी: १४३.७७ मिमी
- गुहागर: १२७.६० मिमी
- मंडणगड: १२०.२५ मिमी
- संगमेश्वर: ११०.०० मिमी
- राजापूर: १०६.२५ मिमी
- दापोली: १०५.०० मिमी
- चिपळूण: ८७.७७ मिमी
- लांजा: ८४.६० मिमी
- खेड: ६५.१४ मिमी
निवळी घाटात दरड कोसळली; दुचाकीस्वार जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय देवरुख येथील अंतर्गत मार्गावर मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने येथील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती.
गोळप येथे संरक्षक भिंत कोसळून नुकसान
पावसाच्या संततधारेमुळे मौजे गोळप येथील मानेवाडी भागात राहणारे सागर शशिकांत मोहिते यांच्या घराशेजारील संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत मोहिते यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक महसूल प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
हवामान विभागाचा पुढील ५ दिवसांचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा हा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ३० जून ते ४ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. विशेषतः ३ आणि ४ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांनी आणि मच्छीमारांनी अरबी समुद्रात किंवा पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 01-07-2026














