रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) च्या जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा आता देवरुखचे सक्रिय कार्यकर्ते अभिजित शेट्ये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजप रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी अधिकृत पत्रक जारी करून या नियुक्तीची घोषणा केली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्राद्वारे अभिजित शेट्ये यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला घनिष्ठ संपर्क, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांमध्ये असलेली मजबूत पकड यामुळे अभिजित शेट्ये यांनी अल्पावधीतच पक्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. देवरुख व संगमेश्वर परिसरात त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची त्यांची शैली ही त्यांच्या जमेची बाजू मानली जाते.
या नियुक्तीमुळे संगमेश्वर आणि देवरुख परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अभिजित शेट्ये यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 01-07-2026














