रत्नागिरी : आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात शांतता, सुव्यवस्था, स्वच्छ निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी मनुज जिंदल यांनी कडक निर्बंध जारी केले आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान ध्वनिप्रदूषण, शासकीय मालमत्तेची विदुपता, अवैध जाहिराती, धार्मिक वा जातीय रंग चढवणाऱ्या कार्यक्रमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांसाठी ही नियमावली बंधनकारक असेल.
ध्वनिक्षेपक वापरावर कडक निर्बंध प्रचार मोहिमेदरम्यान मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक वापरल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या शांततेस आणि आरोग्यास बाधा पोहोचते, या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा चाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या बाहनाबर किंवा स्थिर ठिकाणी ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही ध्वनिक्षेपकाचा वापर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही.
शासकीय मालमत्ता, सार्वजनिक ठिकाणे ‘पोस्टरबाजी’ मुक्त
आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक मालमतेवर जसे की कार्यालये, शाळा, रुग्णालये, सार्वजनिक इमारती, बसस्थानके इत्यादी बॅनर, पोस्टर्स, कटआऊटस्, पेंटिंग्ज, फलक किंवा होर्डिंग्ज लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. संबंधित परवानगीशिवाय कोणत्याही खाजगी जागेवर किंवा इमारतीबर प्रचार साहित्य लावल्यास ती कारवाई योग्य बाब मानली जाईल.
धार्मिक स्थळे आणि शैक्षणिक संस्था परिसरात प्रचार बंदी धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था व रुग्णालयांच्या आसपासच्या परिसरात तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करणे, सभा घेणे किंवा रैली काढणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच, जात, भाषा, धर्म या आधारावर शिबिरे, मेळावे किंवा सभा आयोजित करणे पूर्णपणे निषिद्ध असेल. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहतील.
शासकीय आवारात सभा किंवा प्रचारास बंदी
जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी यांची कार्यालये, शासकीय विश्रामगृहे, आणि इतर सर्व सरकारी संस्था यांच्या आवारात कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम, सभा, रॅली किंवा घोषणा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी प्रचार साहित्य लावणे, घोषवाक्ये लिहिणे, किंवा मतदारांना प्रलोभने देणे देखील मनाई आहे.
वाहतूक सुरळीत राहावी म्हणून नियम
प्रचारादरम्यान रस्त्यांवर बॅनर, पोस्टर किंवा फ्लेक्सा लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी कोणतीही कृती निषिद्ध आहे. तसेच, कोणत्याही राजकीय पक्षाने दहा पेक्षा अधिक वाहनांचा ताफा प्रचारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुद्रणालय आणि प्रकाशकांसाठी दिशा-निर्देश
मुद्रणालयांचे मालक, प्रकाशक यांनी नमुना मतपत्रिका बा प्रचार साहित्य छापताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय प्रचार साहित्य प्रकाशित केल्यास निवडणूक आचारसंहितेचा भंग म्हणून कठोर कारवाई केली जाईल.
धरणे, आंदोलन आणि मोर्चावरही नियंत्रण
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शासकीय व सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धरणे, आंदोलन, मोर्चे किंवा उपोषण आयोजित करण्यास बंदी असेल. यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील, मतदान प्रक्रियेवर कुठलाही ताण येणार नाही.
शांततामय निवडणुकीचे आवाहन
जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांना आवाहन केले आहे की, निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि कायदेशीर मार्गाने पार पाडावी. ‘नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. सदर आदेश निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी संपेपर्यंत लागू राहणार असून, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 10/Nov/2025













