Lanja : मोकाट गुरे सोडणाऱ्या धुंदरे येथील मालकांवर गुन्हा दाखल

लांजा : ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करून मोकाट गुरे सोडणाऱ्या धुंदरे येथील तीन गुरे मालकांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये लांजा ते धुंदरे या रस्त्यावर येथील गुरे मालक रवींद्र बालशेठ गांधी (वय ५८), बाबल्या पांडुरंग लांबोरे (वय ५७) आणि प्रभाकर कृष्णा लिंगायत (वय ५२ वर्षे सर्व राहणार धुंदरे लांजा) हे आपली गुरे मोकाट सोडत होते. ही गुरे या लांजा धुंदरे या रस्त्यावर मोकाटपणे फिरत असतात. त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये बसत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चार चाकी व अन्य वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत होता. त्याचप्रमाणे काही छोटे-मोठे अपघाताच्या घटना देखील घडत होत्या.

या प्रकरणी बेनी खुर्द खेरवसे ग्राम पंचायतीच्या सरपंच रूपाली रवींद्र लोटणकर यांनी संबंधित गुरे मालकांना आपली गुरे मोकळी न सोडता ती बांधून ठेवावीत अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यांच्या या सूचनेकडे या तीनही गुरे मालकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. त्यामुळे अखेर सरपंच लोटणकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात या पकरणी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी वरील तीनही गुरे मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१२ कलम ९० (अ) (१) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी.एस. रेवणे हे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 12/Nov/2025