Ratnagiri : राज्यनाट्य स्पर्धेत ‘फुर्वज’ च्या कलाकारांनी जिंकली रसिकांची मने !

रत्नागिरी : कोकणात एखादा प्रकल्प येणार म्हटल्यावर जमीन विकण्याची घाई केली जाते आणि यातून कुटुंब कलह निर्माण होतात. त्याचबरोबर भोंदुगिरी आणि त्याला फसणारी जनता याची उत्कृष्ट मांडणी करणाऱ्या ज्वलंत सामाजिक विषयावर ‘फुर्वज’ ही कलाकृती सादर करण्यात आली. विनोदी अंगाने तसेच थोडे गंभीरपणे नाट्यकृती सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकण्यात यातील कलाकार यशस्वी झाले. या नाटकात मालवणी भाषेचा तडका पहायला मिळाला.

राज्यनाट्य स्पर्धेतील रत्नागिरी केंद्रावर मंगळवारी ज्ञान प्रबोधिनी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, दत्तवाडी, राजापूर या संस्थेने प्रसाद पंगेरकर लिखीत ‘फुर्वज’ हे नाटक सादर केले. या नाटकाचा दिग्दर्शन प्रसाद पंगेरकर यांनीच केले होते. नाटकात मालवणी भाषेचा तडका असल्याने तसेच उत्कृष्ट विनोदाचा टायमिंग कलाकारांनी साधल्याने नाट्यगृहात हास्याचे फवारे उडत होते. तसेच शेवटच्या टप्यात गंभीरताही दाखविण्यात आल्याने हे सर्व बाजूने नाटक उत्कृष्ट झाले.

या नाटकात कोकणात येणारे प्रकल्प तसेच भोंदूगिरी या विषयावर भाष्य करण्यात आले. सदाशिव हा पूर्वी मुंबईत नोकरी करत होता. परंतु कोरोनाच्या कालावधीत तो उद्ध्वस्त झाला. त्याची नोकरी गेली शेवटी त्याने आपल्या पत्नी पार्वती व मुलगा कार्तिक तसेच मुलगी सुंदरा या तिघांना घेऊन गावी येण्याचा निर्णय घेतला. तो गावात राहून छोटे-मोठे उद्योग करू लागला. यातून तो आपल्या कुटुंबाचे पोट भरू लागला. मुलगा कार्तिक हा नोकरी निमित्त मुंबईत गेला. तो त्याच्या आत्येकडे राहू लागला. सगळा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरु होता. परंतु गावात प्रकल्प येण्याची घोषणा झाली. आणि इथनच जमिन विकण्याची धावपळ सुरू झाली.

कार्तिकने सांगितले की मला मुंबईत खोली घ्यायची आहे त्यासाठी मला पैसे हवे आहेत. यावर पार्वतीने सांगितले, की जमीन विका आणि त्याला पैसे द्या. यासाठी सदाशिव तयार होता. परंतु तो या जमिनीतील त्याचा भाऊ आणि दोन बहिणी असे तीन हिस्से करणार असे सांगतो. यातून पार्वती व सदाशिव खटके उडू लागतात. दरम्यान सदाशिव झोपेत असताना त्याला स्वप्न पडते आणि या स्वप्नात त्याचे पूर्वज येतात आणि ही जमिन विकलीस तर याद राख असे सांगतात. हे स्वप्न त्याला वारंवार पडू लागते. शेवटी तो जमीन न विकण्याचे ठरवतो.

कुटुंबाला तो झपाटला आहे असे वाटते. त्याची पत्नी पार्वती एका साधू बाबाकडे जाते. त्याच्याकडून शुद्ध होण्यासाठी २५ हजार रुपये देऊन पाणी आणते. त्याचाही काही फरक पडत नाही. त्यानंतर गावातीलच एक भगत आणला जातो. तोही २५ हजार रुपयाला या कुटुंबाला लुबाडतो. त्याचासुद्धा जराही फरक पडत नाही. शेवटी ज्योतिषांकडे जातो. शांती करायचे सांगून तोही २५ हजार रुपयांचा गंडा या कुटुंबाला घालतो.

असे एकूण ७५ हजार रुपयांची फसवणूक होते. हे कुटुंब सर्व उपाय करुन थकते. आणि हताश होते. शेवटी पार्वती आपल्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सर्व दागिने काढून मुलाच्या हातात देते आणि विकायला सांगते. मी माझ्या हिमतीवर खोली घेईन, असे ठरवतो आणि इथे नाटकाचा शेवट होतो.

नाटकात पार्वती म्हणून ऋतुजा मेस्त्री, सदाशिव प्रसाद पंगेरकर, कार्तिक-विघ्नेश कणेरी, सुंदरा-स्वरा मेस्त्री, नारायण-प्रशांत मेस्त्री, विष्णू-ओमकार गुरव, भाग्या-भरत जाधव, जोशी-संजय गोरे, फुर्वज- बाळाराम नाचणेकर यांनी काम केले आहे. यातील पार्वती, नारायण आणि विष्णू यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर प्रकाश संयोजक राकेश दांडेकर, अथर्व ठाकूरदेसाई, पार्श्वसंगीत – प्रणव गिरकर, नेपथ्य-जयवंत आंबेलकर, मिलिंद शिंदे, रंगभूषा खुशी आडिवरेकर, भूमी आडिवरेकर तर नेपथ्य सहाय्य म्हणून प्रदीप श्रृंगारे यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 13/Nov/2025