Rajapur : कोदवली पुनर्वसन वसाहतीमधील गटाराचे पाणी रस्त्यावर

राजापूर : शहराजवळील कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पुनर्वसन वसाहतीमधील गटाराचा पाईप गेले वर्षभर फुटलेल्या स्थितीत आहे. त्यातून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा आणि फुटलेल्या पाईपमधून वाहणारे गटारातील पाणी यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.

पुनर्वसन वसाहतीतील गटाराची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांवर तत्काळ तोडगा काढून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी तहसीलदार विकास गंबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर अंकुश पावसकर, जयप्रकाश नार्वेकर, सलाम खतीब, एजाज काझी, वहीदा बामणेकर यांच्यासह अन्य लोकांची स्वाक्षरी आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पुनर्वसन वसाहत वसलेली आहे. या भागामध्ये लोकवस्ती, हॉटेलसह अन्य विविध प्रकारांच्या व्यावसायिकांची दुकाने थाटलेली आहेत. याच भागामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याच्या समस्येने येथील नागरिक त्रस्त असताना गेल्या वर्षभर फुटलेल्या पाईपलाईनमधून रस्त्यावर येणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येलाही लोकांना सामोरे जावे लागत आहे. पुनर्वसन वसाहत परिसरातील दत्त मंदिरानजीक असलेल्या गटाराजवळ वर्षाभरापूर्वी जलवाहिनी फुटलेली आहे. यामुळे गटाराचे घाणीचे पाणी रस्त्यावरून वाहत असून, त्यामुळे या भागात दुर्गंधीही पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 13/Nov/2025