◼️नगरपालिकेचा गाडा हाकण्यासाठी अनुभवाला नागरिकांची पसंती
➡️ रत्नागिरी : “विषय कोणताही असो, त्याचा जर सखोल अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते,” हे वाक्य एका शिक्षिकेला नव्याने सांगण्याची गरज नाही. याच विचाराने आणि शिस्तीने आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या सौ. शिल्पा सुर्वे आता रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या या ‘अभ्यासू’ व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रशासकीय अनुभवामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
◼️शिक्षिका ते लोकप्रतिनिधी : एक यशस्वी प्रवास
शिल्पा सुर्वे यांनी आपल्या जीवनाची सुरुवात एक शिक्षिका म्हणून केली. शिक्षकी पेशात असलेली शिस्त, संयम आणि कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती त्यांनी राजकारणात आल्यानंतरही कायम ठेवली. मागील दोन टर्म त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांनी प्रभागातील समस्यांवर केवळ चर्चा न करता, प्रशासकीय पातळीवर त्या कशा सोडवायच्या याचा सखोल अभ्यास करून विकासकामे मार्गी लावली. त्यांची ही कारकीर्द एका कर्तृत्ववान स्त्रीचे यश अधोरेखित करणारी ठरली आहे.
◼️”प्रशासकीय अनुभव हीच जमेची बाजू”
रत्नागिरीसारख्या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करताना केवळ राजकीय भाषणबाजी उपयोगाची नाही, तर नगरपालिकेच्या कायद्यांचे आणि प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत बोलताना अनेक जागरूक नागरिक आणि विश्लेषक सांगतात की, “नगरपालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल, तर ज्याच्या हातात सूत्रे आहेत, त्याला प्रशासनाची खडान् खडा माहिती हवी. शिल्पा सुर्वे यांच्याकडे मागील १० वर्षांचा नगरपालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या हाती शहराची सूत्रे देणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल.”
◼️वाढता जनाधार
नगरसेवक पदाचा अनुभव आणि शिक्षकी पेशातील सुसंस्कृतपणा यामुळे शिल्पा सुर्वे यांना रत्नागिरीकरांचा मोठा जनाधार मिळत आहे. केवळ आपल्या पक्षाचे मतदारच नव्हे, तर सामान्य नागरिकही एका अभ्यासू महिलेला नगराध्यक्ष म्हणून पाहण्यास उत्सुक असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
8:57 AM 11/21/2025












