रत्नागिरी : आंबिया बहरातील आंबा, काजू फळ पीक विमा योजनेला गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ हजार १२८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, पुढील पाच दिवसांत अजून सहा हजार बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे.
बदलत्या हवामानामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना राबवण्यात येते. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळांतील आंबा व काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण दिले जाते.
या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. तसेच खातेदार शेतकरीव्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही यांना योजना लागू आहेत; मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. विमा योजना जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांत जिल्ह्यातील दोन हजार ७९८ शेतकऱ्यांनी १३ हजार २४ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता.
सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने हंगाम लांबणीवर पडणार आहे. गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम आंब्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीपोटी १०० कोटींचा लांभाश सुमारे ३२ हजार बागायतदारांना मिळाला होता; परंतु परतावा जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे बागायतदारांनीही यंदा विमा उतरवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात गर्दी केली होती. आतापर्यंत २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी इतक्या बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे. त्यासाठी दहा हजार बागायतदार कमी पडत आहेत. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. या कालावधीत बागायतदारांनी विमा काढावा.
चालू वर्षी आंबिया बहर योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू केले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा किंवा गारपीट (तक्रार नोंदवणे आवश्यक) या हवामान धोक्यांपासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हा. यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) व ई-पीकपाहणी नोंदणी आवश्यक आहे- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 27/Nov/2025














