Dervan Walawalkar Hospital Camp: डेरवण येथे ७ ते २१ जुलै दरम्यान ‘घोरणे निदान व उपचार’ शिबिर

स्लीप ॲपनियांबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम; सवलतीच्या दरात होणार ‘स्लीप स्टडी’ चाचणी, नावनोंदणी सुरू

चिपळूण (रत्नागिरी): Dervan Walawalkar Hospital Camp अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील प्रसिद्ध बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात एक महत्त्वाचे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या कान, नाक आणि घसा (इ.एन.टी.) विभागाच्या वतीने येत्या ७ ते २१ जुलै २०२६ या पंधरवड्यात घोरण्याचे अचूक निदान आणि त्यावर उपचारासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घोरण्याशी संबंधित आजारांबद्दल जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

सवलतीच्या दरात होणार ‘स्लीप स्टडी’

या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे घोरण्याचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात ‘स्लीप स्टडी’ (Sleep Study) चाचणी केली जाणार आहे. या अत्याधुनिक चाचणीमुळे रुग्णाला घोरण्याचा त्रास नेमका कशामुळे होत आहे, याचे शास्त्रीय कारण आणि अचूक निदान करणे शक्य होणार आहे. शिबिराच्या १५ दिवसांच्या कालावधीत दररोज एक याप्रमाणे एकूण १५ स्लीप स्टडी चाचण्या पूर्ण करण्याचा संकल्प इ. एन. टी. सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांनी सोडला असून, यासाठी रुग्णालयात अधिकृत नावनोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

घोरणे हा गंभीर आजार; हृदयविकाराला आमंत्रण

वैद्यकीय क्षेत्रात घोरण्याकडे केवळ एक साधी शारीरिक समस्या म्हणून न पाहता तो एक गंभीर आजार मानला जातो. याविषयी माहिती देताना तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, घोरण्याच्या जुनाट आजारामुळेच पुढे जाऊन उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि हृदयविकाराचा झटका (हार्ट ॲटॅक) यांसारख्या अत्यंत गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. हीच बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी वालावलकर रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे.

ही लक्षणे असल्यास त्वरित तपासणी आवश्यक

रात्री झोपेत मोठ्याने घोरणे, सकाळी उठल्यानंतर शरीराला फ्रेश न वाटणे, दिवसभर कामाच्या ठिकाणी सतत झोप येणे, दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवताना अचानक डुलकी लागणे, रात्री झोपेत श्वास कोंडून गुदमरल्यासारखे वाटणे, मानसिक नैराश्य येणे आणि कोणत्याही कामात उत्साह न वाटणे, ही सर्व लक्षणे ‘स्लीप ॲपनियां’ची (Sleep Apnea) असू शकतात. अशा रुग्णांनी त्वरित स्लीप स्टडी करणे गरजेचे आहे.

रुग्णांसाठी शिबिर ठरणार वरदान

“घोरण्याच्या त्रासाकडे ढिसाळपणे पाहणे भविष्यात आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे ही लक्षणे असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर आणि वरदान ठरणार आहे,” अशी माहिती वालावलकर रुग्णालयाच्या संचालक डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली आहे. कोकणातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 22-06-2026