रत्नागिरी/जयगड : निवळी ते जयगड मार्गावर आगरनरळ (ता. जि. रत्नागिरी) येथे उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. १० डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल मनिषा समोर हा अपघात झाला. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदय मनोहर कुलकर्णी (वय ३८, रा. कोरेगाव, जि. सातारा) हे आपला ट्रक (क्र. टी.एन./७०/ए.सी./०४५७) घेऊन जात असताना त्यांनी आगरनरळ येथील मनिषा हॉटेल समोर रस्त्याच्या डाव्या बाजूला ट्रक उभा केला होता.
त्याचवेळी निवळीकडून जयगडच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (क्र. एम.एच./४६/बी.यु./४३०७) तिथे आला. या ट्रकचा चालक अरमान सरवल अली याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता हयगयीने आणि भरधाव वेगाने ट्रक चालवून रस्त्याच्या कडेला बंद स्थितीत उभ्या असलेल्या उदय कुलकर्णी यांच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
चालकावर गुन्हा दाखल
या अपघातानंतर उदय कुलकर्णी यांनी जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आयशर ट्रक चालक अरमान सरवल अली (वय २८, रा. तुर्भे नाका, सानपाडा, नवी मुंबई) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा (गु.र.नं. ५५/२०२५) पुढील तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 12/Dec/2025












