राज्यात महाविकास आघाडीला सुमारे १८० ते २०० जागा मिळतील : आ. भास्कर जाधव

राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघात गेली २० वर्षे आमदार म्हणून नव्हे, तर तुमचा भाऊ म्हणून राजन साळवी यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सुमारे १८० ते २०० जागा मिळतील, असा आशावाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, या निवडणुकीत खुद्दारी विरुद्ध गद्दारी अशी लढत असेल, असे त्यांनी ठासून सांगितले.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी त्यांच्या प्रचारार्थ राजापूर शहरातील मातोश्री सभागृहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.

राज्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यातील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूरची जागा काँग्रेसला न मिळाल्याने थेट महाविकास आघाडीला आव्हान देत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत विचारले असता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड हे आपले चांगले मित्र आहेत. ते निश्चितच निवडणुकीतून माघार घेतील आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील, असा विश्वास एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात चार लढती शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना (शिंदे यांचा पक्ष) यांच्यात होत आहेत, याकडे कसे पाहता, असे विचारले असता ही लढत खुद्दारी विरुद्ध गद्दारी असल्याचे त्यांनी सांगितले.

या विधानसभा निवडणुकीत राज्यातील चित्र कसे असेल त्यावर बोलताना राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून सुमारे १८० ते २०० जागा नक्की मिळतील, असा आत्मविश्वास भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला. मागील २० वर्षे राजन साळवी यांनी आमदार म्हणून नाही, तर तुमचा हक्काचा भाऊ म्हणून सेवा केल्याचे आ. जाधव म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 30/Oct/2024