रत्नागिरी जिल्हा ‘कुष्ठरोग मुक्ती’च्या उंबरठ्यावर; आता केवळ ८४ रुग्ण, आरोग्य विभागाकडून मोहिमेला वेग

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे जिल्हा आता कुष्ठरोग मुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. २०२७ पर्यंत रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे ‘कुष्ठरोग मुक्त’ करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ८४ कुष्ठरोगी रुग्ण असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाची मोहीम यशस्वी

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम राबवून आरोग्य विभागाने मोठी जागरूकता निर्माण केली आहे. २०२४-२५ या वर्षात ग्रामीण आणि शहरी भागांत मिळून सुमारे ३२ हजार ८५० लोकांची तपासणी करण्यात आली. यातील ५७३ संशयितांपैकी २२ जणांना कुष्ठरोगाचे निदान झाले होते. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम म्हणून रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

तालुकानिहाय कुष्ठरोग रुग्णांची संख्या

जिल्ह्यातील सध्याच्या रुग्णसंख्येचा तालुकानिहाय आढावा खालीलप्रमाणे आहे:

तालुकारुग्णांची संख्या
चिपळूण१६
राजपूर११
रत्नागिरी१४
संगमेश्वर१०
लांजा०८
खेड०७
मंडणगड०७
दापोली०६
गुहागर०५
एकूण८४

(माहिती स्रोत: आरोग्य विभाग, रत्नागिरी)

ही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका

जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहीम नसली तरी सर्व आरोग्य केंद्रांवर वर्षभर तपासणी सुरू असते. कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी वेळेत उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि अपंगत्व टाळता येते.

खालील लक्षणे दिसून आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा:

  • त्वचेवर फिकट रंगाचे बधीर (संवेदना नसलेले) चट्टे उमटणे.
  • त्वचा तेलकट आणि गुळगुळीत चमकणारी असणे.
  • कानांच्या पाळ्या जाड होणे.
  • मज्जातंतूंमध्ये वेदना जाणवणे.
  • हात-पायांना मुंग्या येणे किंवा अशक्तपणा जाणवणे.

आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आरोग्याबाबत कोणतीही शंका असल्यास भीती न बाळगता आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. लवकर निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे मुळापासून नष्ट करणे शक्य आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:38 20-04-2026