Koyna Valley Expedition: कोयना खोऱ्यात बहुउद्देशीय निसर्ग अभ्यास मोहीम संपन्न

चिपळूणच्या तज्ज्ञांकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनची पाहणी; गाळ साचल्याने कोयना धरणाची साठवणूक क्षमता ३५ टक्क्यांनी घटल्याचे निरीक्षण

रत्नागिरी / चिपळूण: ‘Koyna Valley Expedition’ | पर्यावरण आणि जलसंधारणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची मोहीम यशस्वीरीत्या पार पडली आहे. अर्थ फाऊंडेशन आणि ग्लोबल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने शेजारील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना खोरे परिसरात बहुउद्देशीय निसर्ग अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वयंस्फूर्त मोहिमेमध्ये चिपळूणचे प्रसिद्ध निसर्ग-पर्यावरण अभ्यासक समीर कोवळे, जल अभ्यासक शाहनवाज शाह आणि कृषी अभ्यासक पृथ्वीराज पवार यांनी सक्रिय सहभाग घेऊन या दुर्गम भागातील पर्यावरण, जलसंपदा आणि लोकजीवनाचा सखोल अभ्यास केला.

विस्थापित गावांचा जंगल परिसर आणि शिवसागर जलाशयाची पाहणी

या अभ्यास मोहिमेदरम्यान सहभागी शिलेदारांनी सह्याद्री पर्वतरांगा, कोयना खोरे परिसर तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतच्या बफर झोनमधील विविध दुर्गम भागांची पाहणी केली. काही अत्यंत दुर्गम भागांमध्ये ट्रेकिंग आणि गिर्यारोहण (क्लाइंबिंग) करत टीमने स्थानिक नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला. या मोहिमेदरम्यान बाजे-वाजेगाव, वनकुसवडे, पळासरी आदी विस्थापित गावांचा जंगल परिसर, कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा विस्तीर्ण भाग, आसपासची गावे आणि स्थानिक शेतशिवार यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यंदा उन्हाळा लांबल्याने वाढलेल्या उष्णतेचा विपरीत परिणाम परिसरातील जलस्रोत आणि पर्यावरणावर झाल्याचे निरीक्षण यावेळी नोंदविण्यात आले.

वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप; साठवणूक क्षमतेत ३० ते ३५ टक्क्यांनी घट

स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ हणमंत सुतार यांनी मोहिमेतील सदस्यांना दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, सन २००० पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप प्रचंड वाढली आहे. परिणामी, पावसाळ्यात डोंगराची माती वाहून आल्याने मोठ्या प्रमाणात गाळ शिवसागर जलाशयात साचला आहे. या गाळामुळे कोयना धरणाच्या पाणी साठवणुकीच्या मूळ क्षमतेत सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसेच या जंगल परिसरात ‘ॲकेशिया’ आणि ‘निलगिरी’ यांसारख्या विदेशी वृक्षांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय, जगातील एवढ्या मोठ्या धरणाच्या जवळ असूनही स्थानिक पातळीवर सिंचन व्यवस्थेचा मोठा अभाव असल्याने शेती व पूरक व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. येथील स्थानिकांचे जीवन प्रामुख्याने पारंपरिक शेती, पशुपालन आणि शेळीपालनावरच अवलंबून आहे.

शिवसागरचे पाणी आटल्याने बुडालेली मंदिरे आणि पुरातन वास्तू पुन्हा उघड्या

यंदा जलाशयाची पाण्याची पातळी कमालीची घटल्याने धरण निर्मितीपूर्वी (१९६० च्या दशकात) पाण्याखाली बुडालेल्या जुन्या गावांचे, मंदिरांचे आणि ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. अभ्यासकांनी बाजे-वाजेगाव येथील ऐतिहासिक ग्रामदैवत ‘श्रीदेवी बाजूबाई मंदिर’, ‘श्री लक्ष्मी देवी मंदिर’, ‘राणीबाईचा वाडा’ तसेच अनेक पुरातन घरगुती वस्तूंच्या अवशेषांची बारकाईने पाहणी केली. यासोबतच पळासरी गावातील जुन्या लोकवस्तीचे अवशेष, मारुती मंदिर आणि वनकुसवडे येथील उंबरघळ परिसरातील नैसर्गिक पुरातन गुहेचाही सखोल अभ्यास करण्यात आला. या संपूर्ण मोहिमेसाठी स्थानिक मार्गदर्शक नीलेश फुटाणे आणि हणमंत सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 23-06-2026