रत्नागिरी: प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (RDCC Bank) पोटनियमांच्या दुरुस्तीसाठी मराठा मंडळाच्या सभागृहात एक विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत बँकेच्या प्रगतीला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय अवघ्या १५ मिनिटांत मंजूर करण्यात आले. यामध्ये बँकेचे भागभांडवल वाढवण्यासह संचालक मंडळाची संख्या वाढवण्यावर सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
भागभांडवल ७५ कोटींवरून थेट १२५ कोटींवर
शासनाच्या सहकार खात्याच्या नवीन धोरणानुसार बँकेच्या पोटनियमांमध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या. यानुसार बँकेची आर्थिक क्षमता आणि पत वाढवण्यासाठी भागभांडवल ७५ कोटी रुपयांवरून थेट १२५ कोटी रुपये करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
संचालकांच्या जागा २४ वरून २५ होणार; मतदारसंघांची पुनर्रचना
बँकेच्या भविष्यातील निवडणुका लक्षात घेता, सद्यस्थितीत असलेल्या २१ संचालकांच्या जागांमध्ये वाढ करून ती २५ करण्याचा महत्त्वपूर्ण बदल पोटनियमात करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याभरातील काही मतदारसंघांचे विभाजन करून दोन स्वतंत्र मतदारसंघ तयार केले जाणार आहेत:
- कृषी पणन व व्यक्ती: आता कृषी पणन आणि शेतीमाल प्रक्रिया संस्थांसाठी १ स्वतंत्र आणि सर्वसाधारण व व्यक्ती घटकासाठी दुसरा स्वतंत्र मतदारसंघ असेल.
- गृहनिर्माण व पगारदार संस्था: गृहनिर्माण व गृहतारण संस्थांसाठी १ आणि पगारदार नोकरांच्या संस्थांसाठी १ असे दोन वेगळे मतदारसंघ असतील.
- मजूर व स्वयंरोजगार संस्था: मजूर संस्थांसाठी १ आणि स्वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार संस्थांसाठी १ अशी स्वतंत्र विभागणी केली जाईल.
- औद्योगिक व मच्छीमार संस्था: औद्योगिक वाहतूक व्यवसाय संस्थांसाठी १ आणि मच्छीमार व अन्य सहकारी संस्थांसाठी १ स्वतंत्र मतदारसंघ असणार आहे.
निवडणूक लढवण्यासाठी कडक अटी; सहकार प्रशिक्षण सक्तीचे
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आणि संस्थांसाठी आता नवीन नियम लागू होणार आहेत:
- उमेदवार ज्या संस्थेचे प्रतिनिधित्व करत असेल, त्या संस्थेचे बँकेत किमान १ लाख रुपयांचे भागभांडवल असणे अनिवार्य आहे.
- संबंधित संस्थेचा बँकेशी सलग ३ वर्षे कर्जव्यवहार असावा.
- सर्वसाधारण संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या बँकेत किमान १ लाख रुपयांच्या ठेवी (FD) असाव्यात.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ३ दिवसांचे सहकार प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक ठरेल.
सोने-चांदी तारण कर्जाची मर्यादा आता २० लाखांवर! : सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देत बँकेने सोने-चांदीच्या दागिन्यांवर दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत दुप्पट वाढ केली आहे. यापूर्वी ही मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत होती, ती आता २० लाख रुपये करण्याबाबत सभेत संमती देण्यात आली.
प्रस्ताव सहकार खात्याकडे पाठवणार
पोटनियमातील या सर्व बदलांना मंजुरी मिळाली असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव तातडीने सहकार खात्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली. या विशेष सभेला बँकेचे सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 05-05-2026














