चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी रात्री उशिरा एक थरारक आणि भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पंचामृत ढाब्यासमोर एका भरधाव ट्रकने तब्बल ८ गाड्यांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात सर्व गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेत पुण्यातील दोन पर्यटक किरकोळ जखमी झाले असून, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ३ मे २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडला. राजस्थान पासिंगचा एक ट्रक (क्र. RJ-19- GH- 8403) घेऊन चालक महामार्गावरून अत्यंत बेदरकारपणे आणि भरधाव वेगात जात होता. यावेळी चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि समोर असलेल्या इनोव्हा गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
साखळी पद्धतीने गाड्या एकमेकांवर आदळल्या!
हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा गाडीला धडक बसल्यानंतर ती पुढील बीएमडब्ल्यू (BMW) कारवर जाऊन आदळली. त्यानंतर साखळी पद्धतीने (Chain Reaction) एकामागे एक अशा एकूण ८ गाड्या एकमेकांवर आदळल्या. महामार्गावर अचानक झालेल्या या विचित्र अपघातामुळे रात्रीच्या वेळी एकच खळबळ उडाली आणि वाहतूक विस्कळीत झाली होती.
या ८ गाड्यांचे झाले मोठे नुकसान:
अपघाताच्या तीव्रतेमुळे खालील गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे: १. बीएमडब्ल्यू-३२०डी (MH-12- NU-9348) २. इनोव्हा (MH-12- GC-7934) ३. आयशर ट्रक (NH-47- BY-8697) ४. अपघातग्रस्त ट्रक (RJ-19- GH-8403) ५. बोलेरो पिकअप (MH-08- AP-9943) ६. रिक्षा (MH-08- AQ-673) ७. ट्रक (MH-09- CU-3259) ८. ट्रक (MH-08- EA-7008)
पुण्यातील दोन पर्यटक किरकोळ जखमी
या भीषण अपघातामध्ये बीएमडब्ल्यू कारमधील फिर्यादी चैतन्य अनिल बेंगळे (वय २७, राहणार: वडगाव शेरी, पुणे) आणि त्यांचे मामा सेंटैंगो देवासगायम डेव्हीड हे दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. इतका मोठा अपघात होऊनही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे.
ट्रक चालक फरार; पोलिसांत गुन्हा दाखल
अपघात झाल्यानंतर आरोपी ट्रकचालक जखमींच्या मदतीसाठी न थांबता किंवा पोलिसांना या घटनेची कोणतीही माहिती न देता आपले वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला.
याप्रकरणी जखमी कारचालक चैतन्य बेंगळे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी अज्ञात फरार ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास चिपळूण पोलीस करत असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:45 07-05-2026














