दापोलीत ९-१० मे रोजी दापोली समर सायक्लोथॉन

रत्नागिरी : दापोलीत येत्या ९ आणि १० मे रोजी दापोली समर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ९ व १० मे २०२६ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदानावर करण्यात आले आहे.

यासाठी राज्यातील अनेक सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.

ही सायकल स्पर्धा १ ते २०० किमी अंतराची असून ५० किमी कोस्टल सिनिक रूट, ४ ते २०० किमी शॉर्ट सिटी लूप, १ व २ किमी फन राइड अशा गटांत होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ७५, १००, १२५, १५०, १७५, २०० किमी सायकल चालवणाऱ्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातील स्थानिक स्पर्धकांना प्रत्येकी ३००, ४००, ५००, ६००, ७००, ८०० रोख रक्कम बक्षीस असेल. शिवाय इतर काही खास बक्षिसेही दिली जातील. ५० किमी कोस्टल सिनिक रूट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर ते आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णै, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल.

फन राइड विनामूल्य असून इतर राइडसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी लिंक https://www.townscript.com/e/dsc9 आहे. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७, ९०२८७४१५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत यामध्ये सहभागी होत जास्तीच जास्त अंतर सायकल चालवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 07-05-2026