Sangmeshwar: देवळे फाट्यावर भीषण अपघात! उभ्या रिक्षांना कारची जोरदार धडक; सांगलीचे दोन तरुण जखमी

संगमेश्वर: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वरजवळील देवळे फाटा येथे पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्ता कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना एका भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा दुरुस्त करणारे सांगलीतील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून दोन्ही रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नेमकी घटना काय?

अंगारकी संकष्टीनिमित्त सांगली येथील रिक्षा चालक अनुप तुकाराम पाटील आणि नितीन सुरेश हुलवाने हे आपल्या रिक्षा घेऊन गणपतीपुळे दर्शनासाठी निघाले होते. ५ मे रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास देवळे फाटा येथील ‘ओपन टेरेस हॉटेल’ जवळ नितीन हुलवाने यांची रिक्षा (MH 10 4 3611) अचानक बंद पडली.

रिक्षा नादुरुस्त झाल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला लावण्यात आली होती. त्यांना मदत करण्यासाठी अनुप पाटील यांनीही आपली रिक्षा (MH 08 AQ 3363) त्यांच्या पुढे उभी केली होती.

दुरुस्ती सुरू असतानाच काळाचा घाला

ज्यावेळी मजीर नजीर बुटलेर हे रिक्षा दुरुस्त करत होते आणि आनंदा अडसुळे हे बॅटरीच्या सहाय्याने उजेड दाखवत होते, त्याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव अल्टो कारने (MH 12 HF 7067) या दोन्ही रिक्षांना भीषण धडक दिली.

कार चालक अनिल शिवाजीराव पाटील (रा. येळावी, ता. तासगाव) याने कार अतिवेगात आणि बेदरकारपणे चालवत प्रथम नितीन हुलवाने यांच्या रिक्षाला धडक दिली, ज्यामुळे रिक्षा जागीच पलटी झाली. त्यानंतर ही कार अनुप पाटील यांच्या रिक्षावर जाऊन आदळली.

दोन तरुण जखमी, कार चालकावर गुन्हा दाखल

या धडकेत रिक्षा दुरुस्त करणारे मजीर नजीर बुटलेर आणि आनंदा विजय अडसुळे (दोघेही रा. सांगली) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी अनुप तुकाराम पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार चालक अनिल पाटील याच्याविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:

  • भारतीय न्याय संहिता २०२३: कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब)
  • मोटार वाहन कायदा: कलम १८४

घटनेचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत असून, महामार्गावरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांबाबत प्रवाशांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 08-05-2026