रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला असून, रत्नागिरीतील एका विद्यार्थिनीने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. रत्नागिरीची कन्या नवेली सचिन भिंगार्डे हिने दहावीच्या परीक्षेत चक्क १०० टक्के गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मिळवले १०० टक्के यश
दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेसाठी नवेलीने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध अभ्यास आणि अतिशय कठोर परिश्रम घेतले. मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहत तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आज १०० टक्के गुणांच्या रूपात तिला मिळाले आहे. निकाल जाहीर होताच १०० टक्क्यांचा आकडा पाहून नवेलीसह संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला उधाण आले.
असा राहिला नवेलीचा शैक्षणिक प्रवास
नवेलीचा शैक्षणिक पाया हा सुरुवातीपासूनच भक्कम राहिला आहे. तिचे इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले. त्यानंतर तिने इयत्ता ९ वी आणि १० वी चे शिक्षण रत्नागिरीतील नामांकित फाटक हायस्कूल येथून पूर्ण केले. शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, शाळेतील पोषक वातावरण आणि तिची स्वतःची अफाट जिद्द यामुळेच तिला हे शिखरावरचे यश गाठता आले आहे.
कुटुंबाची भक्कम साथ आणि सेलिब्रेशन
कोणत्याही विद्यार्थ्याच्या यशात कुटुंबाचा वाटा सिंहाचा असतो. नवेलीच्या या नेत्रदीपक यशानंतर तिचे वडील सचिन भिंगार्डे आणि आई सारंगी भिंगार्डे यांनी आपल्या लाडक्या लेकीला पेढा भरवून तिचा आनंद द्विगुणित केला आणि तिचे तोंडभरून कौतुक केले. नवेलीचे वडील सचिन भिंगार्डे हे रत्नागिरीतील एक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत, तसेच ते ‘रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे’ संचालक म्हणूनही आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. आई-वडिलांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला हे यश मिळवता आले, अशी भावना नवेलीने व्यक्त केली आहे.
नवेली भिंगार्डे हिच्या या शंभर नंबरी यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्यावर विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.














