रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांविरुद्ध आपली कंबर कसली असून, जिल्ह्याच्या विविध भागांत एकाच वेळी धडक मोहीम राबवण्यात आली आहे. या कारवाईत खेडशी, राजापूर, संगमेश्वर आणि दापोली परिसरातून दारूबंदी आणि जुगार कायद्यांतर्गत एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी रोख रक्कमेसह मोठ्या प्रमाणात अवैध मुद्देमालही जप्त केला आहे.
१. खेडशीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यावर कारवाई
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेडशी-गयाळवाडी रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ पोलिसांनी पहिली कारवाई केली. मिरजोळे (जांभळफाटा) येथील रहिवासी प्रवीण बाचराव मजगांवकर (३२) हा कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. राजापूर तालुक्यात ७ लिटर हातभट्टीची दारू जप्त
सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या पथकाने राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली-पानेरे रोडवर सापळा रचला होता. येथील एका आंब्याच्या झाडाखाली अवैध रित्या ७ लिटर गावठी हातभट्टीची दारू बाळगल्या प्रकरणी नितीन लहु परकर (४६, रा. दळे लासेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ७०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
३. संगमेश्वरमध्ये ७० वर्षीय वृद्धेवर दारूबंदीची कारवाई
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी (मोरेवाडी) येथे एका घराच्या मागील शेडमध्ये विक्रीच्या उद्देशाने गावठी दारू साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली असता सत्यवती शांताराम मोरे (७०) या वृद्धेकडून २००० रुपये किमतीची १५ लिटर हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. संगमेश्वर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार ही कारवाई केली आहे.
४. दापोलीत मटका जुगारावर धाड; आरोपी रंगेहात अटकेत
दापोली तालुक्यातील दाभोळ येथील लोकमान्य टिळक परिसरात बेकायदा मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथील एका बंद पान टपरीच्या बाजूला जुगार खेळवणाऱ्या यासीन इस्माईल मुगाये (४८, रा. तांबडी मोहल्ला) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे देवानंद बोरकर यांनी ही कारवाई केली. आरोपीकडून ३३० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांचा कडक इशारा
जिल्ह्यात अवैध रित्या दारू विक्री, हातभट्टी आणि जुगार यांसारखे प्रकार सुरू असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 09-05-2026














