मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! उभ्या ट्रॅव्हल्सला कारची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील चौघांसह ५ जण गंभीर

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे नाक्याजवळ अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी सकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास एका उभ्या खासगी आरामबसला पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील ५ जण गंभीर जखमी झाले असून कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स (MH 10 ZG 5054) प्रवाशांना उतरवण्यासाठी भरणे येथील एस.एम.एस. हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या कडेला उभी होती. याच वेळी मुंबईकडून संगमेश्वरच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार वेगात आली आणि उभ्या असलेल्या बसवर पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरात होती की, कार बसच्या मागील भागात घुसली आणि आतमध्येच अडकली.

जखमींची नावे

अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने कारचे पत्रे कापून बाहेर काढावे लागले. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. परशुराम गुणाजी थेराडे (५०, रा. संगमेश्वर) २. प्रतीक्षा परशुराम थेराडे (४५, रा. संगमेश्वर) ३. शिल्पा परशुराम थेराडे (२५, रा. संगमेश्वर) ४. अर्जुन घोंडिबा चाळके (२७, रा. संगमेश्वर) ५. जनार्दन (२८)

सर्व जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भरणे नाका ठरतोय ‘डेथ ट्रॅप’

गेल्या काही दिवसांपासून भरणे परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आकडेवारीनुसार:

  • आठवड्याभरात ८ अपघात: गेल्या सात दिवसांत या परिसरात छोटे-मोठे ८ अपघात झाले आहेत.
  • एक मृत्यू: या अपघातांच्या मालिकेत एका व्यक्तीला आपला जीवही गमवावा लागला आहे.

अवैध पार्किंगमुळे वाढतोय धोका

महामार्गावर भरणे नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला अवजड वाहने, ट्रक आणि खासगी बसेस अनधिकृतपणे उभ्या केल्या जातात. महामार्गाचे काम सुरू असल्याने आणि रस्त्यालगत उभ्या असलेल्या या वाहनांचा अंदाज येत नसल्याने पाठीमागून येणारी वाहने त्यावर आदळत आहेत.

नागरिकांची मागणी: रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालक आणि मालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यातील प्राणांतिक अपघात टाळता येतील.

या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 11-05-2026