Sangmeshwar: पुर्ये-कोचरी मार्गावरील पुलाचे काम पूर्णत्वास

साखरपा : पुर्ये मुख्य रस्ता ते जांभवाडी (ता. संगमेश्वर) दरम्यान मोडकळीस आलेला जुना कॉजवे हटवून त्या ठिकाणी आता पूल बांधण्यात आला आहे. आमदार किरण सामंत यांनी जिल्हा वार्षिक साकव योजनेतून या पुलाचे काम मंजूर करून पूर्णत्वास नेल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे या मार्गावरून पावसाळ्यात निर्धोक वाहतूक होणार आहे.

पुर्ये जांभवाडीनजीकचा जुना कॉजवे अत्यंत धोकादायक अवस्थेत होता. या मार्गावरून दररोज मोठी रहदारी असते. या पुलामुळे ओझरवाडी, बौद्धवाडी, घडशीवाडी, गवळीवाडी आणि धनगरवाडी, कोचरी व प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र माचाळ येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात आणि दैनंदिन प्रवासात मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे येथे नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात होती. ग्रामस्थांची मागणी आणि या मार्गाची गरज लक्षात घेऊन आमदार सामंत यांनी जिल्हा वार्षिक साकव योजने अंतर्गत या पुलाला मंजुरी मिळवून दिली आणि निधी उपलब्ध करून दिला. यासंदर्भात येथील उपसरपंच संजीव तथा बापू लोटणकर यांनी आ. किरण सामंत यांच्याकडे पुलासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या मार्गावर आता नव्याने पूल उभारण्यात आला आहे.

या पुलासाठी ६० लाखांचा निधी आ. सामंत यांनी उपलब्ध करून दिला आणि आता पुलाचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे पुर्ये, कोचरी व माचाळकडे जाणारी वाहतूक पावसाळ्यातही सुस्थितीत होणार आहे. विकासकामाचा शब्द पाळल्याबद्दल पुर्ये आणि कोचरी गावातील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत व उपसरपंच बापू लोटणकर यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, आ. सामंत यांच्या माध्यमातून अन्य विकासकामेही मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची प्रतिक्रिया उपसरपंच बापू लोटणकर यांनी बोलताना दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 13-05-2026