NEET UG 2026: ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्यानंतर पुढे काय? पुन्हा Registration करावं लागणार का? Fee Refund मिळणार? जाणून घ्या 9 मोठ्या प्रश्नांची उत्तरे

मुंबई: ३ मे रोजी झालेली नॅशनल टेस्टिंग एजन्सीची (NTA) नीट (NEET UG) परीक्षा पेपरफुटीमुळे अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी असून, त्यांच्या मनात पुनर्परीक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या गोंधळात विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी NTA ने काही तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या मनातील शंका आणि सविस्तर उत्तरे:

१. पुन्हा अर्ज (Registration) करावा लागणार का? उत्तर: नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ३ मेच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. NTA कडे असलेला आधीचा डेटाच पुढील परीक्षेसाठी ग्राह्य धरला जाईल.

२. पुन्हा परीक्षा फी (Exam Fee) भरावी लागेल का? उत्तर: नाही. विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षा फी वैध राहील. पुनर्परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

३. आधीची फी परत (Refund) मिळणार का? उत्तर: होय. NTA ने स्पष्ट केले आहे की, नियमांनुसार आधी भरलेली फी विद्यार्थ्यांना परत केली जाईल. पुनर्परीक्षेचा संपूर्ण खर्च NTA स्वतःच्या संसाधनांतून करेल.

४. नवीन हॉल तिकीट (Admit Card) जारी होणार का? उत्तर: होय. पुनर्परीक्षेच्या नवीन वेळापत्रकानुसार NTA नवीन ‘ऍडमिट कार्ड’ जारी करेल. ते अधिकृत वेबसाईटवरून पुन्हा डाऊनलोड करावे लागतील.

५. परीक्षा केंद्राचे पर्याय (Choice) पुन्हा द्यावे लागतील का? उत्तर: नाही. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेले केंद्रांचे प्राधान्यक्रम (Preferences) NTA कडे सुरक्षित आहेत, तेच कायम राहतील.

६. तेच परीक्षा केंद्र (Allocation) मिळेल का? उत्तर: याबाबत अद्याप स्पष्टता नाही. प्रशासकीय कारणास्तव किंवा सुरक्षेच्या कारणास्तव NTA केंद्रांमध्ये बदल करू शकते.

७. नवीन परीक्षेची तारीख (Exam Date) कधी जाहीर होणार? उत्तर: अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. NTA लवकरच सुधारित वेळापत्रक आपल्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करेल.

८. अधिकृत अपडेट्स कुठे पाहायचे? उत्तर: विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता NTA ची अधिकृत वेबसाईट (exams.nta.ac.in/NEET) नियमितपणे तपासावी.

९. पेपरफुटीची चौकशी कोण करणार? उत्तर: केंद्र सरकारने या कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश CBI (Central Bureau of Investigation) ला दिले आहेत.

पुनर्परीक्षेचे आव्हान

परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले असले, तरी पारदर्शक पद्धतीने पुन्हा परीक्षा घेण्याचे मोठे आव्हान NTA समोर आहे. सीबीआय चौकशीतून या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 13-05-2026