दापोली: विनापरवाना ट्रॅक्टर चालवणे बेतले जीवावर; चालक जागीच ठार, दोन मजूर गंभीर जखमी

दापोली: दापोली तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टरवर बसलेले अन्य दोन मजूर या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दापोली तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी दरम्यानच्या रस्त्यावर ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

उतार असलेल्या रस्त्यावर सुटला ताबा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चालक सुनील बंधन बडाईक (वय २८ वर्षे, मूळ रा. झारखंड, सध्या रा. दस्तुरी, खेड) हा ट्रॅक्टर (क्र. एमएच-१७-व्ही-४९६) घेऊन भोईवाडीकडून फरारे जंगलजेटीच्या दिशेने जात होता. सुनीलकडे ट्रॅक्टर चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना (Driving License) किंवा तांत्रिक ज्ञान नव्हते. उतार असलेल्या रस्त्यावरून जात असताना अचानक त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. या भीषण अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला.

दोन मजूर ट्रॅक्टरखाली चिरडले

अपघाताच्या वेळी ट्रॅक्टरवर चालकाच्या बाजूला बसलेले दोन कामगार ट्रॅक्टरखाली चिरडले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींची नावे: १. सोनाली (शानाबाई) तुकाराम चव्हाण (वय ४० वर्षे): यांच्या डोक्याला, पायाला, कमरेला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. २. संतोष दत्तू चौगले (वय ४१ वर्षे): हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मृत चालकाविरुद्ध दापोली पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभिजित रामचंद्र पवार यांनी फिर्याद दिली आहे. प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून असे समोर आले आहे की, मृत चालकाने कोणत्याही परवान्याशिवाय आणि निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूला आणि इतरांच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरला आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 16-05-2026