रत्नागिरी, दि. २५ (विशेष प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘करवीर हायकर्स’ संस्थेच्या सात शिलेदारांनी अत्यंत प्रतिकूल हवामान आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीवर मात करत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल ५,३६४ मीटर उंचीवर असलेल्या दुर्गम आणि खडतर ‘एव्हरेस्ट बेस कँप’ (Everest Base Camp – EBC) वर शनिवारी या ७ जणांच्या पथकाने यशस्वी चढाई केली. या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सपत्निक या मोहिमेत सहभाग घेऊन हे यश संपादन केले आहे.
तब्बल उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात, अतिशय दुर्गम वाटेवरून प्रवास करत या पथकाने शनिवारी (२३ मे) ‘एव्हरेस्ट बेस कँप’वर भारताचा राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ अभिमानाने फडकवला, तसेच भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे प्रदर्शन करून या यशस्वी मोहिमेची सांगता केली.
कस्तुरी सावेकर यांच्या नेतृत्वाखाली मोहीम फत्ते!
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी जगातील सर्वोच्च ‘एव्हरेस्ट’ पर्वत सर करणाऱ्या आणि जगातील सर्वात धोकादायक व मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणारा ‘अन्नपूर्णा’ पर्वत सर करणारी जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेली कस्तुरी सावेकर हिच्या खंबीर मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही ‘एव्हरेस्ट बेस कँप २०२६’ मोहीम पार पडली. कस्तुरीच्या अनुभवाचा या संपूर्ण पथकाला मोठा फायदा झाला.
या ७ साहसी गिर्यारोहकांचा मोहिमेत समावेश
भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी असलेल्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे १५ मे रोजी हे पथक दाखल झाले होते. या मोहिमेत खालील सात जणांचा समावेश होता: १. राहुल गायकवाड (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी) २. प्रशांत सातपुते (जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी) ३. डॉ. सुप्रिया सातपुते (सहप्राध्यापिका, बी. के. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज, चिपळूण) ४. आप्पासाहेब मुंडासे (उद्योजक, मुरुम – धाराशिव) ५. विशाल मेहता (उद्योजक, कोल्हापूर) ६. नुपूर मठकर (सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर) ७. अक्षय मठकर (सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर)
जगातील सर्वात धोकादायक विमानतळापासून झाली सुरुवात
या मोहिमेची थरारक सुरुवात काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या ‘लुकला’ विमानतळावरील छोट्या वि पाण्याच्या प्रवासानंतर झाली. लुकला येथे उतरल्यानंतर प्रत्यक्षात ‘इबीसी’ (EBC Trek) कडे पायी वाटचालीला सुरुवात झाली. हा ट्रेक पुढील मार्गाने पूर्ण करण्यात आला:
लुकला ➔ फाकडींग ➔ नामचे बाजार ➔ तेंगबोचे ➔ दिंगबोचे ➔ लोबुचे ➔ गोरकक्षेप ➔ एव्हरेस्ट बेस कँप
उणे १५ अंश तापमान अन् शारीरिक क्षमतेची कसोटी!
हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता. रात्रीचे तापमान उणे १५ (-१५) अंश सेल्सिअस, तर दिवसा अवघे ४ ते ६ अंश सेल्सिअस तापमान असायचे. विशेषतः लोबूचे ते ‘एव्हरेस्ट बेस कँप’ हा शेवटचा टप्पा अतिशय जीवघेणा आणि थकवणारा ठरला. हाडे गोठवणारे थंड वारे, अत्यंत दुर्गम रस्ता आणि ऑक्सिजनची कमी पातळी यामुळे या पथकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची जागोजागी कसोटी लागत होती. मात्र, निसर्गाच्या या आव्हानांना शरीर आणि मनाने सक्षमपणे सामोरे जात या पथकाने महाराष्ट्राचे नाव हिमालयात उंचावले.
या यशस्वी मोहिमेत नेपाळमधील ‘पीक १५ ॲडव्हेंचर’चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी वाटाड्या (गाईड) म्हणून चोख भूमिका बजावली.














