‘आंबेडकर विचार मंच’चे आवाहन; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
रत्नागिरी:
‘दिल्लीतील दडपशाहीविरोधात रत्नागिरीत मूकमोर्चा’चे आयोजन करून केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवण्यात येणार आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या सरकारी धोरणांविरोधात आणि २३ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारने अमानुषपणे चिरडण्याचा प्रयत्न केल्याने, त्याचे तीव्र पडसाद आता रत्नागिरीत उमटणार आहेत. जंतर-मंतर येथील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस बळाचा आणि दडपशाहीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी, २३ जुलै रोजी रत्नागिरीत एका भव्य मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आंबेडकर विचार मंच’च्या वतीने हाक; शांततापूर्ण मार्गाने निषेध
‘आंबेडकर विचार मंच’च्या वतीने या मोर्चाची हाक देण्यात आली असून सरकारच्या हुकूमशाही आणि संविधानविरोधी कृत्याविरोधात रत्नागिरीतील जनता व विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक नेतृत्वाने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सलग २२ दिवस शांततेच्या मार्गाने उपोषण केले होते. मात्र, आंदोलकांशी लोकशाही मार्गाने चर्चा करण्याचे सोडून प्रशासनाने रात्रीच्या अंधारात पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन अत्यंत निर्दयीपणे मोडून काढले.
मोर्चाचा मार्ग आणि वेळ
हा भव्य मूकमोर्चा गुरुवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गक्रमण करत तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या संपूर्ण मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता अत्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला जाणार आहे.
पत्रकार परिषदेत अभिजीत हेगशेट्ये यांची माहिती; नागरिकांना सहभागाचे आवाहन
पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत हेगशेट्ये यांनी मोर्चाची सविस्तर भूमिका मांडली. “विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशातील लोकशाही हक्क वाचवण्याची ही लढाई असल्याने रत्नागिरीतील तमाम नागरिकांनी, सर्व विद्यार्थी संघटनांनी, नोकरदार वर्गाने तसेच विविध सामाजिक व राजकीय पक्षांनी आपले पक्षभेद बाजूला ठेवून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला रवींद्र कोकाटे, राजू जाधव, बिपीन आयरे, अशोक भाटकर, राजेंद्र कांबळे आणि बजाज झारी आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:54 22-07-2026














