रायगड : रायगड जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असताना हा अर्ज दाखल करण्यात आल्याने रायगडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जुईली दळवी यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला असला तरी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यास ती स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे.
पक्षाकडून संधी मिळाल्यास स्वागत
जुईली दळवी म्हणाल्या, “सध्या मी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. मात्र पक्षाने मला संधी दिली आणि एबी फॉर्म दिला, तर निश्चितच मला पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवायला आवडेल.”
‘अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच अर्ज’
महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नसतानाही अर्ज का भरला, याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “आमच्यावर वारंवार अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. महायुतीचा निर्णय आमच्या बाजूने होईल, अशी अपेक्षा आहे.”
अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय नंतर
पक्षश्रेष्ठींनी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यास काय भूमिका असेल, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, “वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. माझे वडील आमदार महेंद्र दळवी, आई आणि कुटुंबीयांशी चर्चा करून त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या तरी अर्ज मागे घेण्याचा कोणताही विचार नाही.”
राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
अन्याय नेमका कशामुळे झाला, याबाबत जुईली दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, “महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीधर्म पाळतात; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून तो पाळला जात नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळी दिलेले आश्वासन पाळले गेले नाही. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता. याबाबत तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “वारंवार होत असलेल्या या अन्यायामुळे आम्ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता हा अर्ज दाखल केला आहे.”
विकास गोगावले यांच्याबाबतही स्पष्ट भूमिका
शिवसेनेचे नेते विकास गोगावले यांनीही उमेदवारी अर्ज भरल्यास काय भूमिका असेल, यावर बोलताना जुईली दळवी म्हणाल्या, “आमचा पक्ष एकच आहे. वरिष्ठ नेते आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल. उमेदवारी कोणाला द्यायची किंवा दोन्ही अर्ज कायम ठेवायचे, याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल.”
‘शिंदे साहेबांचा निर्णय मान्य, पण तटकरेंचा प्रचार नाही’
अनिकेत तटकरे यांचे नाव अंतिम झाल्यास काय भूमिका असेल, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. मात्र परिस्थितीनुसार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
तसेच, पक्षाकडून अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचे निर्देश मिळाले तरी त्यांच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही स्थिर राहू, पण त्यांचा प्रचार करणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
‘कार्यकर्त्यांचा तटकरे नावालाच विरोध’
जुईली दळवी यांनी दावा केला की, रायगडमधील शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचा विरोध कोणत्याही व्यक्तीला नसून तटकरे कुटुंबाच्या उमेदवारीला आहे. “आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे एकमत आहे की तटकरे यांच्या मुलाला उमेदवारी देऊ नये. इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे आरोप केला की, “संख्याबळ कमी असूनही पालकमंत्रीपद, जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि आता विधान परिषद उमेदवारीवरही तटकरे कुटुंबाचा दावा केला जात आहे. त्यामुळे इतर घटकांवर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.”
रायगडच्या राजकारणात वाढली उत्सुकता
जुईली दळवी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे रायगड जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड झाली असून आगामी काही दिवसांत पक्ष नेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः अनिकेत तटकरे यांची उमेदवारी अधिकृत झाल्यास रायगडमधील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














