गुहागर:
जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर परिसरात अजूनही पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस लांबल्यामुळे गुहागर परिसराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकाआगर धरणातील पाणीसाठा कमालीचा आटला असून, धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या या दिवसांमध्ये वाढलेले ऊन आणि वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून धरणाचा तळ दिसू लागला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंताजनक परिस्थिती
गेल्या वर्षी म्हणजेच गतवर्षी मे महिन्याच्या मध्यावरच पावसाने गुहागर परिसरात सुरुवात केली होती. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, यंदा जून महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नसल्याने आणि सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने मोडकाआगर धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झालेला दिसून येत आहे.
अनेक ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजना धोक्यात
या धरणावर केवळ गुहागर नगर पंचायतच अवलंबून नाही, तर परिसरातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजना देखील याच धरणाच्या पाण्यावर चालतात. यामध्ये असगोली, पाटपन्हाळे, पालशेत, वरवेली, आणि धोपावे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. धरणाची पाणीपातळी झपाट्याने खाली गेल्याने या सर्व गावांच्या नळपाणी योजनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उन्हाळी शेती आणि विहिरींच्या पाणीपातळीवर परिणाम
मोडकाआगर धरणाच्या पाण्यावर या भागात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी शेतीसुद्धा केली जाते. त्याचप्रमाणे, या धरणाच्या साठ्यामुळे परिसरातील शेतकरी व बागायतदार यांच्या विहिरींना पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असतो. परंतु, आता मुख्य धरणच आटल्यामुळे विहिरी आटण्याची आणि परिणामी या संपूर्ण परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:12 06-06-2026














