जातनिहाय जनगणना 2027: केंद्र सरकारकडून ४० प्रश्नांची यादी जाहीर, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होणार इतर जातींची नोंद

गृह मंत्रालयाकडून ‘जनगणना कायदा, १९४८’ अंतर्गत अधिसूचना जारी; लडाख, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये १७ ऑगस्टपासून टप्पा सुरू

जातनिहाय जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी जनगणनेच्या ४० प्रश्नांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. ‘लोकसंख्या मोजणी’ प्रक्रियेदरम्यान नागरिकांना त्यांची जात नमूद करण्यास सांगितले जाईल. स्वतंत्र भारतात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व जातींची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. जनगणनेच्या प्रश्नावलीतील १० व्या प्रश्नात ‘अनुसूचित जाती (एससी) / अनुसूचित जमाती (एसटी) / जात’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, नागरिकांनी सांगितलेली जातच अधिकृतपणे नोंदवली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण यांनी या संदर्भातील प्रश्नांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. माहिती संकलनाची व्याप्ती वाढवून यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, मतदार ओळखपत्र, बँक खाते आणि उपलब्ध असल्यास कोरोना लसीकरणाची माहिती यासारख्या तपशीलांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल साक्षरता आणि ओळखपत्रांच्या तपशीलांसह जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी काही दिवस आधीच हे प्रश्न निश्चित करण्यात आले आहेत.

जनगणनेची प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत पार पडणार आहे. हा टप्पा लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित भागांमध्ये १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे, तर देशाच्या उर्वरित भागात ही प्रक्रिया फेब्रुवारी २०२७ पासून पार पडेल. ‘जनगणना कायदा, १९४८’ अंतर्गत गृह मंत्रालयाने जारी केलेली ही अधिसूचना जनगणना अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या क्षेत्रातील प्रत्येक रहिवाशाकडून ‘घरगुती प्रश्नावली’द्वारे माहिती गोळा करण्याचा अधिकार देते.

दुसरीकडे, या प्रश्नावलीमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) स्वतंत्र कॉलम दिलेला नाही. ओबीसी गणनेसाठी स्वतंत्र रकाना असावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून आणि देशभरातून केली जात होती. मात्र, प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या या ४० प्रश्नांच्या अधिकृत यादीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 15-08-2026