अंदाजपत्रक आणि वर्कऑर्डरपूर्वीच सुरू होते बेकायदेशीर काम; कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याची जिल्हा परिषद अध्यक्षांकडे मागणी
रत्नागिरी: Ratnagiri Kurdhe Bridge Collapse | रत्नागिरी तालुक्यातील मौजे कुर्धे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्धे येथील पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, हे काम पूर्णपणे बेकायदेशीर आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रशासकीय मंजुरी आणि निविदेविनाच काम सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान नदीवर जिल्हा परिषद बांधकाम कंत्राटदाराकडून पुलाचे काम सुरू होते. मंगळवारी या पुलाचा काँक्रीटचा मोठा भाग कोसळून एका निष्पाप मुकादमाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. या कामाचे कोणतेही अंदाजपत्रक तयार नव्हते, तसेच कामाला प्रशासकीय मान्यता, निविदा (Tender) आणि कार्यारंभ आदेश (Work Order) देखील मिळाला नव्हता. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय कंत्राटदाराने नेमके कोणाच्या आदेशाने हे काम सुरू केले? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
संबंधित कंत्राटदाराचा परवाना तातडीने रद्द करा
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कंत्राटदारांची मनमानी आणि बोगस कामे सुरू असल्याचा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. अशा बेकायदेशीर कामांना भविष्यात कोणतीही मंजुरी किंवा निधी देऊ नये, तसेच नियमबाह्य आणि विनापरवाना काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र (परवाना) तातडीने रद्द करावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी लावून धरली आहे.
दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी
या संपूर्ण बेकायदेशीर कामात आणि भ्रष्टाचारात जर जिल्हा परिषदेचे अधिकारी सामील असतील, तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा, असेही त्यात नमूद केले आहे. हे निवेदन देताना शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, युवासेना जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहर प्रमुख सलील डाफळे, विभाग प्रमुख किरण तोडणकर, साजिद पासवकर, उपविभाग प्रमुख सचिन सावंतदेसाई, अजिंक्य सनगरे आणि आदेश भाटकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 13-06-2026














