Kaljhondi Varwade Bus Service: कळझोंडी-वरवडे मार्गावर सहा वर्षांपासून एसटी बससेवा बंद; विद्यार्थ्यांवर पायी चालण्याची वेळ

विद्यार्थ्यांची खडतर पायपीट


रत्नागिरी :
Kaljhondi Varwade Bus Service मागील तब्बल सहा वर्षांपासून ठप्प झाल्याने रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी आणि वरवडे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागत आहे. रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि बससेवेअभावी विद्यार्थ्यांचे होणारे हाल दर्शवणारा एक व्हिडिओ विद्यार्थ्यांनी नुकताच प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी एसटी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे.

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची खड्डे, चिखल आणि झाडी-झुडपातून वाट
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी ते वरवडे या मार्गावर पहिली ते दहावीत शिकणारे अनेक विद्यार्थी दररोज शाळेत ये-जा करतात. मात्र, रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, चिखल आणि दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी-झुडपे यांमुळे या मार्गावरून चालणे अत्यंत बिकट झाले आहे. पावसाळ्यात अंगावर चिखल उडतो, तसेच वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे बाजूला जायलाही जागा उरत नाही. एका अपघातानंतर सहा वर्षांपूर्वी येथील एसटी बससेवा अचानक बंद करण्यात आली होती, जी अद्याप पूर्ववत झालेली नाही.

सत्य परिस्थिती समोर आणणाऱ्या विद्यार्थ्यांचा होणार गौरव: प्रसाद सावंत
नवीन तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अशा दयनीय परिस्थितीशी दोन हात करावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत प्रसाद सावंत यांनी व्यक्त केली. “राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याच मतदारसंघात विद्यार्थ्यांना अशी पायपीट करावी लागत आहे आणि लोकप्रतिनिधी आलिशान गाड्यांतून फिरत आहेत, हे दुर्दैव आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, धाडस दाखवून हा व्हिडिओ बनवून प्रशासनाचे डोळे उघडणाऱ्या विद्यार्थिनी आज्ञा विचारे हिचे व तिच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत त्यांचा गौरव करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्याची दुरुस्ती आणि बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी
कळझोंडी-वरवडे मार्गाच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन प्रसाद सावंत यांनी दिले आहे. जीव मुठीत धरून शिक्षण घेणाऱ्या या लहान मुलांसाठी शासन आणि प्रशासन कधी जागे होणार, असा रोखठोक सवाल उपस्थित करत हा रस्ता आणि बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 14-08-2026