रत्नागिरी: रत्नागिरी पालिका सफाई ठेके यापुढे १९ कोटींऐवजी अवघ्या ९ कोटी रुपयांचे काढण्याचे आदेश राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. रत्नागिरी शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी नगरपरिषद सध्या आर्थिक संकटात असताना सफाई व इतर कामगारांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे अव्वाच्यासव्वा ठेके काढले गेल्याचे या बैठकीत उघड झाले. पालिकेतील या कथित भोंगळ आणि भ्रष्टाचारी कारभाराची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने १९ कोटींचे जुने ठेके रद्द करून पालिकेची तब्बल १० कोटी रुपयांची आर्थिक उधळपट्टी रोखली आहे.
कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबणार; पगार थेट बँक खात्यात
या आढावा बैठकीमध्ये पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अत्यंत विदारक वास्तव समोर आले. मस्टरवर ज्या कर्मचाऱ्यांचा पगार अंदाजे २५ हजार रुपये दाखवला जात होता, त्यांच्या हातात प्रत्यक्ष कामाच्या बदल्यात केवळ १४ ते १५ हजार रुपयेच दिले जात होते. कर्मचाऱ्यांच्या हक्काचा उर्वरित सर्व पैसा थेट ठेकेदारांच्या खिशात जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरात दिवस-रात्र राबणाऱ्या सुमारे ३५० सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्याचे आणि त्यांना हक्काची पगारवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत. पारदर्शकता आणण्यासाठी यापुढे सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांची भ्रष्ट साखळी उध्वस्त
रत्नागिरी पालिकेतील सफाई आणि इतर कामांचे ठेके सत्ताधारी शिवसेनेतीलच काही पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मस्टरवर कागदोपत्री ५० ते ६० कामगार दाखवायचे आणि प्रत्यक्ष जमिनीवर मात्र केवळ २० ते २५ कामगारांकडूनच काम करून घ्यायचे, असा गैरप्रकार पालिकेत सुरू होता. कामगारांच्या नावाखाली मलिदा लाटणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी या बैठकीत जाहीरपणे खडे बोल सुनावले. यापुढे प्रत्येक ठेक्यामध्ये प्रत्यक्षात जेवढे कर्मचारी कार्यरत आहेत, तेवढ्याच कर्मचाऱ्यांचा हिशोब धरून सुधारित ठेका काढण्याचे काटेकोर आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पालिकेची १० कोटींची बचत; कडक कारवाईचे स्वागत
रत्नागिरी नगरपालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या या पद्धतीवर पालकमंत्र्यांनी थेट हातोडा चालवल्यामुळे पालिकेतील एका मोठ्या भ्रष्ट साखळीचे कंबरडे मोडले आहे. १९ कोटी रुपयांचा ठेका थेट ९ कोटी रुपयांवर आणल्यामुळे पालिकेचे वार्षिक १० कोटी रुपये वाचणार आहेत. या वाचलेल्या निधीचा वापर शहरातील इतर प्रलंबित विकासकामांसाठी करणे आता पालिकेला शक्य होणार आहे. एका बाजूला पालिकेचे कोट्यवधी रुपये वाचवत असतानाच, दुसरीकडे शहराची स्वच्छता राखणाऱ्या साडेतीनशे कामगारांना अधिकृत पगारवाढीचा न्याय मिळवून दिल्यामुळे या निर्णयाचे स्थानिक पातळीवर स्वागत केले जात आहे.














