Bhaskar Jadhav WhatsApp Status वरून नव्या चर्चांना तोंड
रत्नागिरी: Bhaskar Jadhav WhatsApp Status | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचे एक सोशल मीडिया स्टेटस सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीपासून मुंबईपर्यंत रंगली असतानाच, भास्कर जाधव यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक सूचक शायरी पोस्ट केली आहे. “हज़ारों अच्छाईयो की कोई रसीद नाही होती, पर एक गलती का पूरा हिसाब रखा जाता हैं”, अशा आशयाचे हे स्टेटस थेट राजकीय संकेतांकडे बोट दाखवणारे असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
“उद्धवसाहेब डरो मत, ही वेळ निघून जाईल”; पक्षप्रमुखांना धीर
या संभाव्य राजकीय भूकंपाच्या आणि बंडखोरीच्या चर्चांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. “उद्धवसाहेब, अजिबात घाबरून जाऊ नका. ही वेळ देखील निघून जाईल. जे होतंय ते होऊ द्या आणि जे होणार आहे ते होणारच आहे. मात्र, हे कठीण दिवस निघून जाण्यासाठी आपल्याला नव्या दमाने नवीन कार्यक्रम हाती घ्यावा लागेल,” असा मोलाचा सल्ला जाधव यांनी दिला आहे. “उद्धवसाहेब डरो मत”, अशा शब्दांत त्यांनी नेतृत्वाला आश्वस्त केले आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची वेगाने बदलती टाईमलाईन
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या संभाव्य बंडखोरीची खळबळजनक टाईमलाईन आता समोर आली आहे:
- १० जून: दिल्लीत एनडीएच्या (NDA) बैठकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘ऑपरेशन टायगर’बाबत प्राथमिक चर्चा झाली. शाह यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून याला संमती मिळवली. त्यानंतर शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत या मोहिमेला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. याच दिवशी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत गुप्त भेट झाल्याचे वृत्त आहे.
- १४ जून: बंडखोरीची कुणकुण लागताच उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे प्रत्यक्ष हजर होते; तर नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन जोडले गेले. मात्र, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव हे खासदार गैरहजर राहिल्याने संशय बळावला.
- १५ जून: खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत जाऊन शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली.
- १६ जून: ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत पोहोचल्याच्या बातम्या धडकल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. परिस्थिती गंभीर बनल्याचे पाहून खासदार अरविंद सावंत यांनी फुटीर गटाला मान्यता देऊ नये, यासाठी लोकसभा अध्यक्षांना तातडीने पत्र पाठवले.
- १७ जून: संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांनी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या दबावाचा निषेध केला. दुसरीकडे, ठाकरेंच्या ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती समोर आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पक्षाने सर्व खासदारांना १८ जूनच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी ‘व्हीप’ बजावला आहे.
काँग्रेसचे उदाहरण देत विरोधकांवर निशाणा
पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या हेतूवर कडक शब्दांत टीका केली. “देशात फक्त आपल्यालाच आणि आपल्याच पक्षाला राहायचे आहे, अशा दुष्ट हेतूने काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात कधीही कुठलाही प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम केले नाही,” असे सांगत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तसेच, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोणी आणि काय पत्र दिले, हा विषय आपल्यासाठी पूर्णपणे गौण असल्याचे सांगत त्यांनी मूळ गाभ्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 18-06-2026














