Rain Alert: मुंबईसह कोकणात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; ‘अलर्ट’ जारी

३ आणि ४ जुलै रोजी कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई: राज्यात मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यानंतर आता जून महिन्याच्या शेवटी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाने जोरदार पकड घेतली आहे. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजधानी मुंबईत पुढील ४ दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत आज ‘यलो’ तर उद्या ‘ऑरेंज अलर्ट’; १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढू लागला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी आज ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, उद्या (बुधवारी) अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. या काळात मुंबईत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, ३ ते ४ जुलै रोजी कोकण किनारपट्टीच्या भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार म्हणजेच अतिवृष्टीचा (Heavy to Very Heavy Rainfall) इशारा देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने पाणीचिंता काहीशी कमी झाली आहे.

रायगड जिल्ह्याला पुढील पाच दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

रायगड जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवस पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. रायगडच्या दक्षिण भागात झालेल्या समाधानकारक पावसामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात २३ जून रोजी दाखल झालेल्या पावसाने मध्यंतरी दोन दिवस दडी मारली होती; मात्र आता पुन्हा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास पुढील दोन-तीन दिवसांत भात लावणीच्या कामांना वेग येणार आहे. विशेष म्हणजे, पावसामुळे रायगडमधील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; सखल भागात पाणी साचण्याची भीती

जूनच्या अखेरीस मुंबईच्या पश्चिम उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे या संपूर्ण परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र आता पावसाचा वेग कमालीचा वाढला आहे. हा पाऊस असाच पुढे काही तास सुरू राहिल्यास अंधेरी सबवेसह इतर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली असून, वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 30-06-2026