मुंबई – उद्धवसेनेच्या सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत विधान परिषदेतही मोठी राजकीय घडामोड घडली. उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी शिंदेसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला.
त्यांच्या विरोधात उद्धवसेनेकडून शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केल्याने या पदासाठी निवडणूक होणार, हे निश्चित झाले आहे. विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि ज. मो. अभ्यंकर यांच्यात आज लढत होणार आहे.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. दुसरीकडे, शिंदेसेनेने उमेदवाराच्या नावाबाबत अखेरपर्यंत गोपनीयता राखली होती.
अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारमध्ये राहून सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही एकत्र होतो तेव्हा चांगले होतो, मग आता स्वार्थी कसे झालो, असा सवालही त्यांनी केला. अहिर यांनी उद्धवसेनेतील आपल्या सर्व पदांचा राजीनामाही दिला आहे.
जे काही करतो ते फुलप्रूफ : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलो आहोत. पॉझिटिव्ह व प्रॅक्टिकल राहणे ही आमची भूमिका आहे. विकासाचा अजेंडा घेऊन सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचा निर्धार घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
जे काही करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे काही अडचण नाही, असेही शिंदे म्हणाले. सचिन अहिर हे तळागाळातील कार्यकर्ते असून त्यांच्या प्रवेशामुळे कामगार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढेल, असा दावा त्यांनी केला.
धक्का बसत नाही : आदित्य ठाकरे
अहिर यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना पक्षाने सर्व काही दिले, तेच स्वार्थासाठी पक्ष सोडत आहेत. कोणाच्या येण्या-जाण्याने पक्ष कमकुवत होणार नाही. पक्षांतराबाबत नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
– अहिर अपात्र का होऊ शकत नाहीत?/अधिवेशन विशेष
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 01-07-2026













