नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक; विविध विकासकामांवरून प्रशासनाला धारेवर धरले
रत्नागिरी:
Ratnagiri Municipal Council Meeting | रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण सभेत शहरातील रखडलेले प्रश्न, विद्यार्थ्यांची व नागरिकांची सुरक्षा तसेच विविध विकासकामांच्या मुद्द्यांवरून स्थानिक नगरसेवकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. शाळा-कॉलेज परिसरातील धोकादायक होर्डिंग्ज हटवण्यापासून ते अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यापर्यंतचे अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत प्रशासकीय पातळीवर घेण्यात आले आहेत.
शाळा आणि कॉलेज परिसरातील जाहिरात फलक तात्काळ हटवणार
शहरातील सर्व शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरात सध्या उभारण्यात आलेले मोठे जाहिरात फलक (होर्डिंग्स) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. हा गंभीर धोका लक्षात घेऊन हे सर्व फलक तात्काळ हटवण्याचा मोठा निर्णय या सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी नगरसेवकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत, प्रशासनाला हे सर्व होर्डिंग्ज त्वरित हटवण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत.
फगरवठार भिंत दुर्घटना: संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार
नुकत्याच झालेल्या पावसामुळे फगरवठार येथील पालिकेच्या रस्त्याकडील संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी सभेत जोरदार चर्चा झाली. संबंधित ठेकेदाराने या भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या खाजगी जागेत खोदकाम करण्यासाठी पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेला पूर्णपणे तोच जबाबदार असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच, ती पडलेली भिंत संबंधित ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने पुन्हा बांधून द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
स्वस्तिक हॉस्पिटलसमोरील अतिक्रमणावरून नगरसेवक केतन शेट्ये नाराज
राम नाका परिसरातील स्वस्तिक हॉस्पिटलच्या जागेत सुरू असलेल्या एका खाजगी बांधकामाचा गंभीर मुद्दा नगरसेवक केतन शेट्ये यांनी सभेत मांडला. विकासकाने पालिकेच्या मुख्य गटारीवर आणि रस्त्यावर तब्बल ५ ते ६ फूट बाहेर येऊन पत्र्याचे फेन्सिंग मारले असून, रस्त्यावर चिरे टाकून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण केला आहे. १८ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात लेखी पत्र देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल शेट्ये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा मार्ग तात्काळ मोकळा करण्याची मागणी केली.
भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांचा विशेष सर्व्हे; स्वच्छतेबाबत कडक नोटीस
शहरातील भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांकडे पालिकेचे अधिकृत परवाने (लायसन्स) आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी पालिकेमार्फत आता विशेष सर्व्हे केला जाणार आहे. जे विक्रेते आपल्या परिसरात स्वच्छता राखत नाहीत, त्यांना कडक नोटीस बजावण्यात येणार आहे. यासोबतच, आरोग्य सभापतींच्या दालनात सर्व विक्रेत्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. बाजार फी वसुलीचा मक्ता देताना विक्रेत्यांकडून ८ महिन्यांची रक्कम पूर्ण भरून घ्यावी आणि त्यांच्यावरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सोपवावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
पोलवरील अनधिकृत केबल्स आणि जाहिरातींवर कायदेशीर कारवाई
नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी पालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवर इंटरनेट, डिश टीव्ही आणि केबल कंपन्यांनी विनापरवानगी टाकलेल्या वायर्सचा मुद्दा उपस्थित केला. या कंपन्या पालिकेला कोणताही कर न देता शहरात व्यवसाय करत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे ठरले. तसेच, या खांबांवर लटकणारे अनधिकृत जाहिरात फलकही तात्काळ हटवण्याची मागणी नगरसेवक निमेश नायर यांनी केली, त्यानुसार प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
दुर्क्षित जलस्त्रोतांची साफसफाई आणि उघड्या विहिरींना संरक्षक कठडे
शहरातील ऐतिहासिक मालको विहीर, तलाव व इतर दुर्लक्षित जलस्त्रोतांची योग्य साफसफाई करून तिथे सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याचा प्रस्ताव नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी मांडला, ज्याला सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच वेगवेगळ्या प्रभागांतील उघड्या विहिरींमध्ये उनाड गुरे कोसळण्याच्या घटना घडत असल्याने, प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागातील खाजगी विहीर मालकांना सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे (भिंत) बांधण्याच्या सूचना द्याव्यात, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
प्रभागातील कामांमध्ये समान न्याय देण्याची लोकप्रतिनिधींची मागणी
आपल्या प्रभागात विकासकामे होत असताना स्थानिक नगरसेवकांना अजिबात विश्वासात न घेता थेट कामांचे नारळ फोडले जात असल्याची जाहीर तक्रार नगरसेविका वर्षा ढेकणे आणि अमित पिलणकर यांनी केली. तर दुसरीकडे, नगरसेवक केतन शेट्ये व अमित पिलणकर यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांना प्रशासनाकडून जाणूनबुजून बगल दिली जात असल्याचा आरोप केला. पालिकेने सर्व नगरसेवकांना समान न्याय देऊन प्रत्येक प्रभागामध्ये समान वागणूक दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी या लोकप्रतिनिधींनी शेवटी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 01-07-2026














