प्रभाग क्रमांक १५ मधील उद्यानास “श्री संत संताजी जगनाडे महाराज उद्यान” नाव देण्याची नगरसेविका वर्षा ढेकणे यांची मागणी

रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकसित होत असलेल्या उद्यानास “श्री संत संताजी जगनाडे महाराज उद्यान” असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा तथा प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सौ.वर्षा ढेकणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाजप्रबोधन, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या विचारांचा व कार्याचा गौरव होण्यासाठी तसेच भावी पिढ्यांना त्यांच्या आदर्शांपासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रभाग क्रमांक १५ मधील उद्यानास त्यांचे नाव देणे अत्यंत उचित व समाजहिताचे ठरेल.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या सामाजिक धार्मिक व आध्यात्मिक कार्याचा सन्मान करण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित उद्यानास “श्री संत संताजी जगनाडे महाराज उद्यान” असे नामकरण करण्यास मान्यता द्यावी व आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 01-07-2026