Lanja: वेरळ घाटात आठवड्यात दुसऱ्यांदा दरड; वाहतूक विस्कळीत

लांजा:

लांजा मुसळधार पाऊस आणि गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटातील डोंगराचा भाग खचून माती आणि मोठे दगड थेट महामार्गावर आल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.

वेरळ घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रस्त्यावरील ढिगारा मोठा असल्याने तातडीने जेसीबी यंत्रणा पाचारण करण्यात आली. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली होती, तर काही काळ वेरळ घाटात वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली होती.

विशेष म्हणजे, आठवड्याभरापूर्वीच याच वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच परिसरात दरड आल्यामुळे या घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लांजा तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला असून, डोंगराळ भागातील माती भुसभुशीत झाल्याने हे दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे.

प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील माती आणि दगड बाजूला केले. महामार्गावरील ढिगारा पूर्णपणे हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, परिसरात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने घाटातून प्रवास करताना वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 02-07-2026