आंबा बागेत विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, ग्रामीण पोलिसांत नोंद
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील पानवल येथे एका ३३ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणातून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार, १ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अविनाश अनंत घवाळी (वय ३३, रा. पानवल घवाळीवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश घवाळी याने बुधवारी दुपारी पानवल परिसरातील एका आंबा बागेत जाऊन अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. औषधाचा परिणाम होऊन काही वेळातच त्याला तीव्र अस्वस्थ वाटू लागले. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अविनाशची तातडीने तपासणी केली. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अविनाशने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 02-07-2026














