संगमेश्वर:
मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरला भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेला हा कंटेनर आरवली येथील उड्डाणपुलाच्या अलीकडे आला असता, चालकाने अचानक ब्रेक लावला. यामुळे तीव्र गतीने जाणारा कंटेनर रस्त्यावरच स्लीप (घसरला) झाला. या अपघातामुळे महामार्गावरील या मार्गिकेची वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
उड्डाणपुलाजवळ विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक लावल्यानंतर नियंत्रण सुटल्याने कंटेनरचा मागील मोठा भाग महामार्गाच्या साईड वॉलवर (संरक्षक भिंत) थेट आडवा झाला. तर कंटेनरच्या पुढील इंजिनचा भाग उड्डाणपुलाच्या खाली असणाऱ्या सर्व्हिस रोडवर जाऊन उतरला. हा अपघात अत्यंत भीषण होता, मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अपघातग्रस्त कंटेनर पूर्णपणे रिकामा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
महामार्गावर वाहनांच्या रांगा; वाहतूक संथ गतीने सुरू
कंटेनरचा मुख्य भाग मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर (लेन) पूर्णपणे आडवा झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग सुरक्षा यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर आडवा झालेला हा अवजड कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले असून, वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 02-07-2026














