रत्नागिरी: रत्नागिरी ऑनलाईन फसवणूक गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, इन्स्टाग्रामवरील एका जाहिरातीच्या मोहापायी तालुक्यातील मिरजोळे येथील एका महिलेला तब्बल १० लाख ३१ हजार २०९ रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. मिरजोळे पाडावेवाडी येथील रहिवासी महिला यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ३ जुलै २०२६ रोजी दुपारी २:४५ वाजता अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी २०२६ ते १८ जून २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला असून, एका सामान्य खरेदीवरून सुरू झालेला हा प्रकार थेट लाखांच्या घरात गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अवघ्या १,००० रुपयांच्या खरेदीपासून झाली फसवणुकीची सुरुवात
फिर्यादी यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘इन्स्टाग्राम’वर कपड्यांची एक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीमधील ड्रेस ऑर्डर करण्यासाठी त्यांनी तिथे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधला. ऑर्डर निश्चित केल्यानंतर त्यांनी ठरलेली १,००० रुपयांची रक्कम क्यूआर कोड स्कॅन करून गुगल पे (Google Pay) द्वारे ऑनलाईन जमा केली. या प्राथमिक व्यवहारानंतर काही दिवसांतच त्यांना फसवणुकीच्या मोठ्या जाळ्यात ओढण्यात आले.
‘ई-कार्ट’च्या नावाखाली विविध शासकीय शुल्काचा बनाव
१,००० रुपये भरल्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी महिला यांना एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतः ‘ई-कार्ट’ (E-Kart) कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे भासवले. तुमचे पार्सल आले असून ते मिळवण्यासाठी ‘गव्हर्नमेंट चार्जेस’ (शासकीय शुल्क) आणि इतर प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. पार्सल अडकल्याची भीती दाखवून आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी लावून धरली.
चार महिन्यांत लाटले १० लाख ३१ हजार रुपये
पार्सल मिळवण्याच्या आणि भरलेले पैसे परत मिळतील या आशेने फिर्यादी यांनी ४ फेब्रुवारी ते १८ जून २०२६ या कालावधीत वेळोवेळी एकूण १० लाख ३१ हजार २०९ रुपये अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या खात्यांवर पाठवले. मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही कोणतेही पार्सल न मिळाल्याने आणि पैसेही परत न आल्याने आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. अखेर त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बीएनएस आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
या सायबर गुन्ह्याची गांभीर्याने दखद घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत असून, सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.














