ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वारसा जपण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय
सातारा:
Maharashtra Fort Conservation: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे साक्षीदार असलेले राज्यातील ८३ गड-किल्ले आता ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गड-किल्ले संवर्धन समितीने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या गडकोटांचे जतन आणि संवर्धन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षापासून सरकारने या कामात विशेष लक्ष घातले असून, या मोहिमेत सातारा आणि नाशिक जिल्ह्यांतील सर्वाधिक प्रत्येकी १६ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुर्गसंवर्धन समितीने सुचवलेल्या किल्ल्यांपैकी ५१ किल्ल्यांचे राज्य संरक्षित स्मारक म्हणून संवर्धनाचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून पुरातत्त्व विभागाने यासंबंधीची संपूर्ण कागदपत्रे पूर्ण केली आहेत.
दुर्गसंवर्धन समितीची शिफारस आणि महसूल प्रक्रिया
शासनाने नेमलेल्या दुर्गसंवर्धन समितीने सुरुवातीला एकूण ९७ किल्ल्यांची नावे सुचवली होती. यामध्ये सातारा, पुणे, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील किल्ल्यांचा समावेश होता. अधिकृत संरक्षण नसल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनामध्ये आतापर्यंत अनेक अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी किल्ल्यांशी संबंधित सर्व महसूल कागदपत्रे, नकाशे आणि ७/१२ उतारे एकत्रित करून ते पुणे पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
प्राचीन स्थापत्य अवशेषांचे होणार जतन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणारे हे गड-किल्ले आजही आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जपत उभे आहेत. या किल्ल्यांवरील तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वारे, पाण्याची टाकी, तळे, तळघर, तसेच गोमुखी पद्धतीचे बांधकाम यांसारखे स्थापत्य अवशेष इतिहासाची साक्ष देतात. गडसंवर्धन समितीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, पहिल्या टप्प्यात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या परंतु अनेक वर्षे असंरक्षित राहिलेल्या किल्ल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
जिल्हावार संरक्षित होणाऱ्या किल्ल्यांची यादी नुसार
- सातारा जिल्हा: चंदन, वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संताजीगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगड.
- ठाणे जिल्हा: तारापूर, केळवे, माहिम, तांदुळवाडी, कोहोझ, अशेरी, गोरखगड, गंभीरगड, सेगवा, भवानगड, मलंगगड, भैरवगड.
- रायगड जिल्हा: खांदेरी, थळ, सागरगड, सांधाजागड, कर्नाळा, मृगगड, सांकशी, सरसगड, पेब, चंद्रगड.
- रत्नागिरी जिल्हा: कनकदूर्ग, साटवली, पालगड, महिपतगड, सुमारगड, नवते किंवा गुढे किल्ला.
- नाशिक जिल्हा: कावनाई, त्रिंगलवाडी, त्रिंबकगड, हर्षगड, भास्करगड, चौल्हेर, धोडप, हातगड, अहिवंतगड, रवळ्या, जवळ्या, मार्कंड्या, इंद्राई, राजदेहेर, चांदवड, डेरमाळ.
- कोल्हापूर जिल्हा: शिवगड, कलानिधीगड, गंधर्वगड, पारगड, गगनगड, पावनगड, सामानगड, महिपालगड.
- पुणे जिल्हा: तिकोना, तुंग, घनगड, हडसर, चावंड, रोहिडा.
- सांगली जिल्हा: प्रचितगड, भूपाळगड, मच्छींद्रगड.
- सिंधुदुर्ग जिल्हा: देवगड.
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा: सुतौंडा.
- अहमदनगर/नाशिक सीमा परिसर: बहादूरगड, हरिश्चंद्रगड, पट्टा, अलंग, कुलंग आणि मदन.
पुढील टप्प्यात आणखी किल्ल्यांचा होणार समावेश
या ८३ किल्ल्यांपैकी ५१ किल्ल्यांच्या राज्य संरक्षित स्मारक संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात असून पुरातत्त्व विभागाने आवश्यक ती सर्व प्रशासकीय पूर्तता केली आहे. महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या गडसंवर्धन समितीचे आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे हे एक मोठे यश मानले जात आहे. जे किल्ले सध्या या यादीत समाविष्ट नाहीत, परंतु ऐतिहासिक तसेच पुरातत्त्वीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशा इतर किल्ल्यांची नावे देखील आगामी दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट केली जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 04-07-2026














