चिपळूण:
White Mongoose Chiplun: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळल्याने वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एका अपार्टमेंटच्या टेरेसची स्वच्छता करत असताना एका तरुणाला इमारतीखालील झाडाझुडपांमध्ये मुक्तपणे वावरणारे हे पांढरे मुंगूस दिसले. त्याने या अनोख्या प्राण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला आणि काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
ल्युसिझम आनुवंशिक वैशिष्ट्यामुळे पांढरा रंग
हा व्हिडिओ वन विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी यावर तातडीने प्रकाश टाकला आहे. रत्नागिरी जिल्हा वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बहुतांश वेळा ‘ल्युसिझम’ (Leucism) या नैसर्गिक आनुवंशिक वैशिष्ट्यामुळे आढळतो. या स्थितीमध्ये प्राण्याच्या अंगावरील रंगद्रव्य कमी असल्याने त्याचा रंग पांढरट दिसतो. मात्र, अशा प्राण्यांचे डोळे लाल नसतात, त्यामुळे हा प्राणी पूर्णतः ‘अल्बिनो’ (Albino) नसून केवळ नैसर्गिक रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पांढरा दिसतो, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंगसाचे नेमके ठिकाण जाहीर न करण्याचे आवाहन
हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असला तरी अशा वन्य प्राण्यांना कोणताही त्रास देऊ नये, तसेच त्यांना पकडण्याचा किंवा त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागीय अधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी केले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेचा विचार करून वन अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ मुंगसाचे नेमके ठिकाण जाहीर न करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरता यावे आणि शिकारी किंवा इतर मानवी हस्तक्षेपापासून कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संवेदनशीलता दाखवावी, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
निसर्ग चक्र आणि शेतीसाठी मुंगसाचे महत्त्व
मुंगूस हा निसर्गतः ‘शेतकऱ्याचा मित्र’ म्हणून ओळखला जातो. साप, उंदीर, घुशी तसेच पिकांचे अतोनात नुकसान करणारे इतर लहान प्राणी व कीटक यांवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण ठेवण्यात मुंगसाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच शेतीचे रक्षण करण्यासाठीही तो अत्यंत उपयुक्त वन्यजीव मानला जातो. त्यामुळे अशा दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन झाल्यास त्यांना कोणताही त्रास न देता, नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनी तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 04-07-2026














