दापोली:
Dapoli Potholes Issue: दापोली-हर्णे या मुख्य मार्गावरील धाकटी आंबवली येथे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी अत्यंत धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. या धोकादायक खड्ड्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी येथे अंडरग्राउंड वीज केबल टाकण्याचे काम करण्यात आले होते, मात्र त्यानंतर रस्ता योग्य पद्धतीने दुरुस्त न केल्यामुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाली असून स्थानिक जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तात्पुरत्या मलमपट्टीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरग्राउंड केबल टाकण्यासाठी हा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणात खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग तांत्रिक नियमांनुसार योग्य पद्धतीने डांबरीकरण करून पूर्ववत करणे बंधनकारक होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने केवळ तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे ही माती वाहून गेली आणि काही ठिकाणी रस्ता खाली बसल्याने मुख्य मार्गावर ४ ते ५ ठिकाणी मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत.
दोन दिवसांत दुचाकींचे अपघात; महिला जखमी
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नोकरदार वर्गाची सातत्याने ये-जा सुरू असते. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा नेमका अंदाज येत नाही, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच एका दुचाकीस्वार महिलेचा येथे भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना, मागील अवघ्या दोन दिवसांत या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
कंत्राटदार आणि प्रशासनाकडून कायमस्वरूपी दुरुस्तीची गरज
खोदकामानंतर संबंधित रस्ता पुन्हा सुरक्षित आणि वाहतूकयोग्य स्थितीत आणण्याची मुख्य जबाबदारी संबंधित यंत्रणा व कंत्राटदाराची आहे. त्यांनी ही जबाबदारी तत्परतेने पार पाडावी अशी रास्त अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित जबाबदार विभागाने तात्काळ या धोकादायक ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी आता धाकटी आंबवली परिसरातील संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:10 04-07-2026














