रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विकासकामांच्या श्रेयवादावरून पुन्हा एकदा महायुतीतील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकसित होत असलेल्या उद्यानाच्या नामकरणाचा. नगरपरिषदेत बहुमताने मंजूर झालेल्या नामकरणाच्या ठरावानंतर श्रेय कोणाचे, यावरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
नगरपरिषदेच्या सभेत ठरावाला मंजुरी
रत्नागिरी नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत संबंधित उद्यानाला “श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान” असे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. हा विषय शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी दिलेल्या पत्रानुसार सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आल्याचे सभेच्या अजेंड्यावरून समजत आहे.
वर्षा ढेकणे यांच्या निवेदनानंतर वादाला सुरुवात
दरम्यान, प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका तसेच भाजप महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी संबंधित उद्यानाला “श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयाला नवे राजकीय वळण मिळाले.
‘प्रस्ताव मी आधी दिला, श्रेय दुसऱ्यांनी घेऊ नये’ – बिपीन बंदरकर
या घडामोडीनंतर शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, संबंधित उद्यानाच्या नामकरणाचा प्रस्ताव आपण पूर्वीच दिला होता, त्यामुळेच हा विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आणि बहुमताने मंजूर झाला, असा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक अपक्ष नगरसेवक अमित विलणकर आणि नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी सभागृहातही या नामकरणाला विरोध दर्शविला होता. मात्र शिवसेनेच्या नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी हा विषय अजेंड्यावर आणून ठराव मंजूर करून घेतला.
‘तेली आळीत उद्यान असल्याने हे नाव योग्य’
बिपीन बंदरकर यांनी सांगितले की, संबंधित उद्यान तेली आळी परिसरात विकसित होत असल्याने श्री संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देणे योग्य आणि समाजाच्या भावनांशी सुसंगत आहे. या नामकरणाला विरोध करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हा विषय सभागृहात मंजूर होण्यासाठी आपण मोलाची भूमिका बजावली असून, आता या निर्णयाचे श्रेय दुसऱ्या कुणी घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
विकासकामांनंतर आता नामकरणावरूनही श्रेयवाद
रत्नागिरी शहरात महायुतीतील हा पहिलाच श्रेयवाद नाही. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवरही भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यात श्रेयावरून वाद निर्माण झाला होता. तो वाद अद्याप पूर्णपणे शांत झालेला नसतानाच आता उद्यानाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
राजकीय वर्तुळाचे लक्ष या वादाकडे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामे, निधी आणि नामकरणाच्या निर्णयांवरून श्रेयवादाचे राजकारण रंगत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील हा नवा वाद कोणते वळण घेतो, याकडे आता रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














