Crocodile Rescue Anjarle: आंजर्ले येथे मगरीच्या पिल्लाला जीवदान

दापोली:

Crocodile Rescue Anjarle: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे मगरीच्या एका पिल्लाला यशस्वीरीत्या पकडून जीवदान देण्यात आले आहे. आंजर्ले येथील बिरवाडी परिसरातील काळभैरव मंदिराजवळ वाहणाऱ्या एका ओहोळात सोमवारी रात्री मगरीचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात काही काळ नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक युवकांनी आणि वन विभागाच्या पथकाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे या वन्यजीवाला सुरक्षित अधिवास मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेस्क्यू टीमची घटनास्थळी धाव

ओहोळात मगरीचे पिल्लू असल्याची माहिती मिळताच ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर दापोली’ संस्थेचे सदस्य प्रतीक बाईत, मनीत बाईत आणि प्रफुल मिसाळ यांनी कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या सदस्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या मगरीच्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर या पिल्लाला वन विभागाचे अधिकारी प्रभू साबणे आणि शुभांगी गुरव यांच्या स्वाधीन करण्यात आले.

ओहोळातील अस्तित्वाबाबत तर्कवितर्क

या यशस्वी रेस्क्यू मोहिमेमुळे मगरीच्या पिल्लाचे प्राण वाचले असून स्थानिक आंजर्लेकर नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या परिसरात कोणतेही मोठे धरण किंवा बंधारा अस्तित्वात नसताना मगरीचे पिल्लू या छोट्याशा ओहोळात नेमके आले कुठून, याबाबत मात्र ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. वन्यजीवाचे प्राण वाचवणाऱ्या वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर टीमच्या या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:13 04-07-2026