तळागाळातील घटकांपर्यंत रोजगार आणि उपजीविकेची साधने पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज
रत्नागिरी:
VBBJ Ramji Yojana Ratnagiri: ‘विकसित भारत जी राम जी’ (व्हीबीजी रामजी) ही योजना ग्रामीण भागात अधिक परिणामकारक आणि चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी (NGO) एकत्र येऊन काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांनी केले. रत्नागिरी येथील नियोजन समिती सभागृहात विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत व्हीबीजी रामजी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपजीविकेची साधने मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हास्तरीय सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, महिला व बाल विकास सभापती मयुरी शिंके, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, समाज कल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, महेश म्हाप, उषा सावंत, शिवानी सावंत आणि पंचायत समिती उपसभापती गजानन धनवडे आदींचा समावेश होता.
मनरेगाचे ‘व्हीबीजी राम जी’ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना सीईओ वैदेही रानडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात पहिल्यांदा रोजगार हमी योजना सुरू झाली होती, ज्याच्या धर्तीवर केंद्र सरकारने ‘महात्मा गांधी मनरेगा’ योजना आणली. आता याच मनरेगाचे ट्रान्सफॉर्मेशन ‘व्हीबीजी राम जी’ मध्ये केले जात असून केंद्र सरकारने ‘विकसित भारत २०४७’ चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता खेंद्रे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील लोकांचे आर्थिक बळकटीकरण करणे आणि विकासाचा दर वाढवणे हाच या योजनेचा मुख्य गाभा आहे.
पारदर्शकता आणि प्रशासकीय मान्यता पत्रांचे वाटप
या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या निमित्ताने पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशासकीय मान्यता पत्रांचे थेट वाटप करण्यात आले. पारदर्शकता हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असून प्रत्येक हाताला काम मिळणे आवश्यक आहे. यासाठी गाव पातळीवर मेळावे घेऊन योजनेची माहिती पोहोचवावी, असे आवाहन रानडे यांनी केले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी रोहयो हर्षलता गेडाम यांनी संगणकीय सादरीकरण (PPT) करून योजनेची सविस्तर माहिती दिली, तर चक्रमेढी फाउंडेशनच्या वैदेही सावंत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी रणजित गायकवाड यांनी मानलेल्या आभाराने झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:45 04-07-2026














