FDA Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात व्यवसायासाठी ३२२ परवाने, २०१७ नोंदणी पत्रे मंजूर

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी तुकाराम मुंढेंचा घेतला धसका; परवाने आणि नोंदणीसाठी व्यावसायिकांची गर्दी

रत्नागिरी:

FDA Ratnagiri (अन्न व औषध प्रशासन विभाग, रत्नागिरी) च्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या धडक कारवाईच्या धसक्यामुळे उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये परवाने तसेच नोंदणी प्रमाणपत्रे घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून या विभागाला जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात शिस्त लागण्यास सुरुवात झाली आहे. नियमबाह्य अन्न व औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून १ एप्रिल ते आतापर्यंत जिल्ह्यात ३२२ परवाने आणि २०१७ नोंदणी प्रमाणपत्रे मंजूर करण्यात आली आहेत.

परवाना नसल्यास ६ महिन्यांचा कारावास आणि ५ लाख दंड

अन्न सुरक्षा व मानदे कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यभरात देण्यात आले आहेत. जर एखादा व्यावसायिक विनापरवाना किंवा विनानोंदणी खाद्यपदार्थांची विक्री व उत्पादन करताना आढळल्यास अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ६३ अंतर्गत ६ महिन्यांपर्यंतचा कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच संबंधित अन्न आस्थापना त्वरित सील किंवा बंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. या कडक नियमांमुळे मागील काही वर्षांपासून सुस्त झालेला अन्न व औषध विभाग आता पुन्हा पूर्णपणे ॲक्टिव्ह झाला आहे.

पनीर आणि चीज पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विशेष पथके

जिल्ह्यात भेसळविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर अन्न आस्थापनांची कसून तपासणी केली जात आहे. विशेषतः पनीर, चीज, चीज ॲनालॉग यांसारख्या पदार्थांमध्ये होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून संशयास्पद नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, मिठाईची दुकाने, खाद्यपदार्थ उत्पादक आणि दूध विक्रेत्यांची कडक तपासणी केली जात आहे.

ऑनलाईन नोंदणी आणि प्रशिक्षणाचे नवे नियम

नव्या नियमांनुसार वार्षिक १२ लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या विक्रेत्यांसाठी नोंदणी फी १०० रुपये प्रतिवर्ष आहे, तर १२ लाखांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्यांना २ हजार ते ५ हजार रुपये प्रतिवर्ष परवाना फी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, अन्न सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे ऑनलाईन प्रशिक्षण घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व दूध संकलन केंद्रे, डेअरीचालक आणि दूध विक्रेत्यांनाही परवाना घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 06-07-2026